नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा २०१९ मध्ये उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये पराभव झाला होता. परंतू, याची धाकधूक असल्याने राहुल गांधी यांनी केरळचा आसरा घेत वायनाडची जागाही लढविली होती. तेथील जनतेने साथ दिल्याने ते खासदार झाले होते. २०२४ मध्येही राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या दोन्ही मतदारसंघातून ते बहुमताने निवडून आले आहेत. अशातच एका जागेवर पाणी सोडण्याचा आजचा शेवटचा दिवस होता, अखेर राहुल गांधी यांनी तो निर्णय घेतला आणि वायनाड सोडले. आता तेथून प्रियंका गांधी निवडणूक लढविणार असल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवार दि. १७ जून रोजी दिली.
काँग्रेसच्या संकटकाळात, राहुल यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून विजयाची खात्री नसताना ज्या वायनाडने साथ दिली त्याच मतदारसंघाला सोडण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. राहुल यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला असून ते रायबरेली मतदारसंघातून खासदारकी कायम ठेवणार आहेत. तर वायनाडची पोटनिवडणूक प्रियंका गांधी लढविणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले आहे. यंदाही राहुल यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. यापैकी वायनाडची जागा ३,६४,४२२ मतांनी जिंकली, तर रायबरेली ३,९०,०३० मतांनी जिंकली होती. आजारी असल्याने सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढविली नव्हती. यामुळे अमेठी आणि रायबरेलीतून कोण लढणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. गेल्यावेळी स्मृती इराणी यांनी अमेठीतून राहुल यांना पराभूत केले होते. यामुळे यावेळी अमेठीतून काँग्रेसने दुसरा उमेदवार दिला होता. त्याने इराणी यांचा पराभव केला.
आज काँग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकीत देशातील सर्वात मोठ्या राज्यावर लक्ष केंद्रीत करण्याची रणनिती आखण्यात आली आहे. यामुळे राहुल यांनी रायबरेलीतूनच खासदार राहावे असा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस राज्यातील जनतेसाठी काम करण्यास उत्सुक आहे, असा संदेश जनतेला देण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे. यामुळे आता उत्तर प्रदेशातील १० विधानसभा जागांवरच पोटनिवडणूक होणार आहे. तर केरळमधील एका लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.