नवी दिल्ली : प्रियंका गांधी या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. माझ्या आधी तिने संसदेत पोहचावे असे मला वाटते हे विधान प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी यंदाच्या निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड या जागांवर निवडणूक लढवली. त्यातील दोन्ही जागांवर ३ लाखांच्या मताधिक्याने राहुल गांधी विजयी झाले. मात्र नियमानुसार १४ दिवसांत त्यांना दोन्ही पैकी १ जागा सोडावी लागणार होती. त्याप्रमाणे राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला तर याच जागेवर प्रियंका गांधी यांना उमेदवारी देण्याचे काँग्रेसने ठरवले.
वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी उभ्या राहणार असून त्याबाबत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटले की, प्रियंका ज्याप्रकारे मेहनत घेत आहे, ती खासदार म्हणून देशाला प्रगतीपथावर नेईल. मीदेखील तिला निवडणूक लढवण्यासाठी दबाव टाकला. संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे हा निर्णय घेतला. प्रियंका गांधी वायनाडमधून लढतेय त्याचा आनंद आहे. हीच ती वेळ आहे जेव्हा प्रियंकाने संसदेत पोहचले पाहिजे असे वाड्रा यांनी सांगितले.
तसेच प्रियंकाने आधी संसदेत पोहचावे ही माझी इच्छा होती. मी मेहनत करत राहीन, पुढील निवडणुकीत भाग घेईन. मी प्रियंकाला तू संसदेत जायला हवं हे समजावलं. कुटुंबाने एकत्रित निर्णय घेतला असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटले. त्याशिवाय घराणेशाहीच्या आरोपावर आधी भाजपाने स्वत:कडे पाहावे. त्यांच्या पक्षात घराणेशाही असणारे नेते भरलेत. जनतेनं अबकी बार ४०० पारचे वास्तव दाखवले. भाजपा अयोध्येतही हरली. राम मंदिर बनवलं परंतु लोकांची घरे उद्ध्वस्त केली. रोजगार दिले नाहीत. भाजपा नेत्यांचा अहंकार लोकांच्या पसंतीस पडला नाही अशी टीका वाड्रा यांनी केली.
दरम्यान, राहुल गांधी उत्तरेत आणि प्रियंका गांधी दक्षिणेत प्रतिनिधित्व करणार आहेत. राहुल वायनाडला आणि प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात येत राहतील. त्यामुळे संपूर्ण देशाची माहिती मिळेल. जेव्हा प्रियंका गांधी संसदेत पहिल्यांदा बोलायला उभ्या राहतील तेव्हा माझ्या अंगावर काटा येईल. मला तिच्या भाषणाची उत्सुकता आहे असंही रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितले.