परभणी : तीर्थक्षेत्र शेगांव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे २६ जून रोजी परभणी जिल्ह्यात आगमन होणार आहे. तीर्थक्षेत्र शेगाव येथील श्रींच्या पालखीने १३ जून रोजी पंढरपुरकडे प्रस्थान केले असून अकोला, पातूर, रिसोड, सेनगाव, डिग्रस, जवळा मार्गे या पालखीचे २६ जून रोजी परभणी जिल्ह्याच्या सिमेवर म्हणजे झिरोफाटा या ठिकाणी आगमन होणार आहे.
२६ जून रोजी श्रीक्षेत्र त्रिधारा येथे पालखी मुक्कामी राहणार असून २७ जून रोजी या पालखीचे परभणी शहरात सकाळी आगमन होणार आहे. नवा मोंढ्यात पालखी मुक्कामी राहणार असून २८ जून रोजी श्रींची पालखी दैठण्याकडे प्रस्थान करणार आहे. २९ जून रोजी गंगाखेडात पालखी मुक्कामी असणार आहे. तेथून पालखी परळीकडे रवाना होणार आहे.