पंढरपूर: खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच मका, उडीद, कांदा, तूर तसेब सोयाबीन बियाण्यांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. वाढत्या किमतीवर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
मागील वर्षी अत्यंत कमी पावसामुळे खरीप हंगामात एवढ्या पेरण्या झाल्या नव्हत्या. मात्र तीव्र दुष्काळानंतर सध्या पूर्वमोसमी पावसाने सोलापूर जिल्ह्यामध्ये समाधानकारक हजेरी लावली आहे. सलग चार ते पाच दिवस पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. आता पावसाने थोडीफार उघडीप दिल्यानंतर आणि जमिनीला वाफसा आल्यानंतर खरिपाची पेरणी सुरू करण्याच्या तयारीत बळीराजा आहे. त्यासाठी आवश्यक बी-बियाणे, खते यांची खरेदी जोरात सुरू आहे.
मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत चालू खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर पेरण्या होण्याची शक्यता असल्याचा अंदाज आल्यानेच अनेक बी-बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या मका, उडीद, कांदा, तूर, सोयाबीन अशा बी-चियाण्यांच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या मक्याच्या बियाणाची पिशवी ही कंपन्यांनी चार किलोची निर्धारित केलेली आहे. काही कंपन्या चार किलोपेक्षा कमी पॅकिंग करुनही विकतात.
मात्र सरासरी चार किलोच्या मक्याच्या पिशवीची किंमत मागील वर्षी बाराशे ते चौदाशे रुपये होती. ती आज कंपनीच्या मनमानीपणामुळे सोळाशे ते अठराशे रुपये किंमतीने विक्री चालू आहे. अशीच अवस्था उडीद, कांदा, तूर, सोयाबीन यांच्याबाबतीत आहे. सर्वच कंपन्यांनी बी-बियाण्यांच्या किंमती वाढविल्या आहेत, या वाढत्या किंमतीवर शासनाचे कोणतेही नियंत्रण
नसल्यामुळे कंपन्या मनमानीपणे दरवाढ करत आहेत. परिणामी, खरीप पिकांच्या लागवडीसाठी मोठा खर्च होत आहे. याबाबत महाराष्ट्र शासन आणि कृषी विभागाने बी-बियाणे किमतीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
बी-बियाणांच्या पिशवीवर किंमत छापलेली असते. मात्र, ही किंमत अव्वाच्या सव्वा असल्याचे दिसून येते. दुकानदारही छापील किंमतीपेक्षा सुमारे १५० ते २५० रुपये कमी घेतात. तेवढ्या किंमतीत त्यांना परवडते म्हणजे त्यांना आणखी कमी किमतीत माल मिळत असणार, हे नक्की. त्यामुळे बी-बियाणे उत्पादक कंपनी, दुकानदार हे अवाजवी किंमत छापून शेतकऱ्यांची लुटमार करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.