सोलापूर – पोलिस निरीक्षकास धक्काबुक्की करून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या तिघांविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादीक उल्फत हुसेन शेख (वय ४९), सोहेल सादीक शेख (वय २५), मोहसीन सादीक शेख (वय २३, रा. घर नं. ६८ बी, सहारा नगर, होटगी रोड, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पिडीत महिला पोलिस अधिकाऱ्याने फिर्याद दाखल केली आहे.
सादीक शेख व इतरांनी सात रस्ता परिसरात असलेल्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्या संपर्क कार्यालयाचे लोखंडी गेट एमएच ०१ झेड ए ०४२४ क्रमांकाची अॅम्बेसिटर कारने धडक देऊन तोडून कार लावून शिवीगाळ करीत गोंधळ घालत होते. त्यावेळी सदर बझार पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी आले व त्यांनी शेख यांना विनाकारण गोंधळ करू नका म्हणून समजविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेख हे पोलिस अधिकारी यांच्या अंगावर पोलिस निरीक्षकांना धक्काबुक्की केली व महिला अधिकाऱ्यांच्या शरीरास हात लावून मनाज लज्जा वाटेल तसे कृत्य करून विनयभंग केला. यावेळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात आणले.
याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द शासकीय कामात अडथळा आणणे व विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक मुल्ला पुढील तपास करीत आहेत.