बंगळुरू : इस्रोने रविवार दि. २३ जून रोजी सलग तिस-यांदा रीयुजेबल लॉन्च व्हेईकल लँडिंग प्रयोगमध्ये यश मिळवले आहे. पुष्पकने प्रगत स्वायत्त क्षमतांचा वापर करून जोरदार वा-याच्या दरम्यान अचूक लँडिंग केले.
लँडिंग प्रयोगाची तिसरी आणि अंतिम चाचणी चित्रदुर्ग, कर्नाटक येथे सकाळी ०७:१० वाजता घेण्यात आली. पहिला लँडिंग प्रयोग २ एप्रिल २०२३ रोजी आणि दुसरा २२ मार्च २०२४ रोजी घेण्यात आला. आरएलव्ही लेक्स-०१ आणि आरएलव्ही लेक्स-०२ मोहिमांच्या यशानंतर आरएलव्ही लेक्स-०३ ने अधिक आव्हानात्मक परिस्थितीत स्वायत्त लँडिंग क्षमता प्रदर्शित केली. भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरने पुष्पकला चित्रदुर्गातील एरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये ४.५ किमी उंचीवर नेले आणि धावपट्टीवर स्वायत्त लँडिंगसाठी सोडले. लेक्स-२ प्रयोगादरम्यान, पुष्पक १५० मीटरच्या क्रॉस रेंजमधून सोडण्यात आले, जे यावेळी ५०० मीटरपर्यंत वाढवण्यात आले. याशिवाय वारेही जोरदार वाहत होते.
लँडिंग वेग ३२० किमी
पुष्पकने क्रॉस रेंज करेक्शन मॅन्युव्ह अंमलात आणून अचूकतेने लँडिंग केले. जेव्हा पुष्पक हेलिकॉप्टरमधून सोडण्यात आले तेव्हा त्याचा लँडिंग वेग ३२० किमी प्रतितास पेक्षा जास्त होता. हा वेग व्यावसायिक विमानांच्या २६० किमी प्रतितास आणि लढाऊ विमानाच्या २८० किमी प्रतितास वेगापेक्षा जास्त आहे. टचडाउन केल्यानंतर त्याचा वेग १०० किमी प्रतितास इतका कमी झाला.
पॅराशूटच्या मदतीने वेग केला कमी
पुष्पकमध्ये बसवलेल्या ब्रेक पॅराशूटच्या मदतीने वेग कमी करण्यात आला. यानंतर लँडिंग गियर ब्रेक लावले आणि वाहन धावपट्टीवर थांबवण्यात आले. धावपट्टीवर स्वत:ला स्थिर ठेवण्यासाठी पुष्पकने रुडर आणि नोज व्हील स्टिअंिरग सिस्टिमचा वापर केला.