पुणे : पुणे हिट अॅन्ड रन प्रकरणी अल्पवयीन मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवार दि. २५ जून रोजी जामीन मंजूर केला आहे. जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणे बेकायदेशीर असून बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. अल्पवयीन मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
अल्पवयीन मुलाच्या आत्याने पूजा जैन यांनी हेबियस कॉर्पसअंतर्गत याचिका दाखल केली होती. ही याचिका हायकोर्टाने स्वीकारली आहे. कल्याणीनगर येथे १९ मे रोजी पहाटे ‘पोर्शे कार भरधाव चालवून दुचाकीस्वार तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या अल्पवयीन कारचालकाला सुरुवातीला तीनशे शब्दांच्या निबंध लेखनासह विविध अटींवर बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला. त्यावर सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्यावर बाल न्याय मंडळाने आदेशात दुरुस्ती करून या मुलाची रवानगी ५ जूनपर्यंत बालनिरीक्षण गृहात केली. नंतर मुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव १२ जूनपर्यंत आणि त्यानंतर २५ जूनपर्यंत सुधारगृहातील मुक्काम वाढविला होता. दरम्यान, काही दिवसापूर्वी अल्पवयीन मुलाच्या मावशीने उच्च न्यायालयात हेबियर्स कोपर्स याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांवर ताशेरे ओढले होते. पुण्यातील कल्याणीनगरच्या पोर्शे कार अपघात प्रकरणी अटकेत असलेला बिल्डर विशाल अगरवालला सत्र न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. यानंतर लगेचच पोलिसांनी पाच वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात अगरवालला अटक केली आहे.
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भयानक स्पीडने पोर्शे कार चालविली होती. यामध्ये त्याने चार पाच वाहनांना धडक दिली होती. यात मोटारसायकलवरून जाणा-या तरुण, तरुणीला त्याने उडविले होते. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. बिल्डर बाळाला वाचविण्यासाठी पिता विशाल अगरवालने आमदारालाही पोलिस ठाण्यात पाचारण केले होते. या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी पोलिसांनीही कसोशीने प्रयत्न केले होते. त्याची दारु पिऊन असल्याची चाचणी मुद्दाम उशिराने घेण्यात आली होती. यामुळे बिल्डरचा मुलगा दारु पिलेला नव्हता असा अहवाल आला होता. यावरून पोलिसांची नाचक्की होऊ लागताच उपमुख्यमंत्र्यांना पुण्यात धाव घ्यावी लागली होती. यानंतर बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यातही बिल्डरने आपली ओळख आणि पैसा लावून रक्त बदलले होते. बिल्डर बाळाच्या आईचे रक्त देण्यात आले होते.