बुलडाणा : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे आजपासून आपल्या अभिवादन दौ-याला प्रारंभ करत आहेत.
आज बुलडाणा जिल्ह्यातील माँसाहेब जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथील राजे लहुजी जाधव यांच्या राजवाड्यात जाऊन ते जिजाऊंना अभिवादन करणार आहेत. तसेच याच ठिकाणावरून त्यांचा अभिवादन दौरा सुरू होणार आहे. दरम्यान, मोठ्या संख्येने ओबीसी समाज यानिमित्ताने सिंदखेड राजा येथे आज शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, याबाबत लक्ष्मण हाके यांनी भाष्य करत सरकारवर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे या कायद्याच्या सभागृहात असल्या पाहिजेत. मात्र त्यासाठी आम्हाला कोणीही दान म्हणून ते करू नका, भूतदया दाखवू नका, तो आमचा हक्क आहे. इथल्या तरुणांच्या त्या भावना आहेत. आमचा ओबीसी जसा-जसा बाहेर येईल, एकत्र येईल, तसा-तसा महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये या सर्व गोष्टींचा प्रभाव पडेल. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला अशी खात्री असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बहुजनांना, ओबीसींना न्याय मिळेल तो दिवस सामाजिक न्याय दिवस
राजर्षि शाहू महाराजांची आज जयंती असून शासनाकडून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. न्याय दिन साजरा केला जात असेल तर शाहू महाराजांनी उभी हयात सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी घालवला आहे. त्यामुळे ज्या दिवशी बहुजनांना, ओबीसींना न्याय मिळेल त्या दिवशी सामाजिक न्याय दिवस साजरा झाला असे मी म्हणेल. अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बोलताना दिली.
हार-तुरे, जेसीबी लावण्यापेक्षा संवाद साधणे महत्त्वाचे
आज मातृतीर्थ सिंदखेडराजा आणि पोहरादेवी येथे आम्ही जाणार असून उद्या आम्ही गोपीनाथ गड आणि भगवानगडावरती जाणार आहोत. आम्ही उपोषण करत असताना प्रत्येक गावातून, वाड्या-वस्तीवरून, तांड्यातून लोक आमच्याकडे येत होते. आमचे उपोषण संपले तरी आजूबाजूच्या गावचे लोक अजूनही तिथे येत होते. त्या सर्वांच्या आग्रहाखातर आम्ही हा दौरा करत आहोत. हार- तुरे, जेसीबी लावण्यापेक्षा संवाद साधणे महत्त्वाचे आहे. हा शक्तिप्रदर्शनाचा विषय नाही तर आमचा हक्क आणि अधिकार वाचवणे हा आमचा उद्देश असल्याचेही लक्ष्मण हाके म्हणाले.