पुणे : प्रतिनिधी
आषाढी वारीसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची तयारी सुरू आहे. प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या शुक्रवारी श्री क्षेत्र देहू येथून आणि श्री क्षेत्र आळंदी येथून शनिवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
पालखी सोहळ्यात सहभागी होणा-या दिंडीतील वारकरी आणि भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा आणि पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. पालखी सोहळ्यासाठी चांदीचा रथ, अब्दागिरी तयार करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यात ३६३ दिंड्या सहभागी होणार आहेत. टाळ, मृदंग, पखवाज, वीणा व पूजेचे साहित्य तयार ठेवण्यात आले आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३९ व्या पालखी सोहळ्यासाठी नव्याने छत्री तयार करण्यात आली असून त्यावर शंख, चक्र, गंध, गरूड, हनुमान यांची चित्रं आहेत.
श्री क्षेत्र आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी, भाविक आणि दिंड्या आळंदीत दाखल होत आहेत. मंदिरातून प्रस्थान झाल्यावर दि. ३० रोजी पालखी सोहळा पुण्यात येणार आहे. आळंदी देवस्थानची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यंदाचा १९३ वा पालखी सोहळा असून २९ जून रोजी पालखी सोहळ्याचे दुपारी प्रस्थान होईल.