28.5 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रमविआने अबू आझमींचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करावा

मविआने अबू आझमींचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करावा

नरेश म्हस्केंचा खोचक टोला

मुंबई : प्रतिनिधी
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, अशी अप्रत्यक्ष मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊतांच्या मागणीवरून खासदार नरेश म्हस्के यांनी खोचक टोला लगावला आहे. महाविकास आघाडीने राज्यात अबू आझमी यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारली. तर महायुतीला मोठा फटका बसला. आता महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली असून खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेह-याबाबत वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. यावर आता महाविकास आघाडी आणि महायुतीतून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

अबू आझमी यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करावा : नरेश म्हस्के
राज्यात महाविकास आघाडीने अबू आझमी यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करावा. तसाही त्यांनी निवडणुकीत झेंड्याचा रंग बदललेला आहे. हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांचा अडीच वर्षांचा घरात बसून केलेला कारभार आणि अडीच वर्ष पायाला भिंगरी बांधून एकनाथ शिंदे यांनी केलेला कारभार याचे मूल्यमापन करावे लागेल, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. महायुतीतील मुख्यमंत्रिपदाच्या चेह-याबाबत नरेश म्हस्के म्हणाले की, आमच्या नेत्यांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा एकनाथ शिंदे असतील, असे त्यांनी म्हटले आहे.

चर्चा करून विषय सोडवणार : बाळासाहेब थोरात
संजय राऊत यांच्या मागणीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, हे चर्चेचे विषय आहेत. हा प्रश्न आम्ही चर्चेने सोडवू. त्यावर वेगळे बोलण्याची गरज नाही. यावर आम्ही चर्चा करू, असे त्यांनी म्हटले आहे.

नेतृत्व निर्णय घेणार : यशोमती ठाकूर
आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की, महाविकास आघाडीचे नेतृत्व आमचे तीनही नेते करत आहेत. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हे तीनही पक्ष मिळून महाविकास आघाडी आहे. त्यांच्या बैठकीत काय ठरेल, हे सर्वांना समजेल, असे त्यांनी म्हटले आहे.
सर्वसामान्यांच्या हितासाठी लढाई : रोहित पवार
आमदार रोहित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी झाली तेव्हा कोणालाच माहिती नव्हते. ही लढाई मुख्यमंत्रिपदाची नाही तर सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे. पदापेक्षा विचारांसाठी लढायला हवे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR