मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या दरम्यान राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक अधिवेशनाला हजर राहिले आहेत. या अधिवेशनावेळी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांची भेट घेतली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना चॉकलेट दिले. त्याचबरोबर अनिल परब यांना पेढा भरवत शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात उध्दव ठाकरे आणि दानवेंची भेट घेतली. यावेळी या नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली. त्यावेळी अनिल परब देखील उपस्थित होते. ही भेट कोणत्या कारणासाठी घेतली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यावेळी चंद्रकांत पाटलांनी पेढा देखील भरवला.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन केले. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात दाखल झाले. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत करत चॉकलेट भेट दिले. उद्धव ठाकरे यांच्यासह अंबादास दानवे आणि अनिल परबही यावेळी उपस्थित होते.