नवी दिल्ली: नीट पेपर लीक प्रकरणामध्ये ओएसिस शाळेचा प्रिन्सिपल डॉ. एहसान-उल-हक आणि सेंटर सुप्रिटेडेट इम्तियाज याला सीबीआयने शुक्रवारी ताब्यात घेतले. डॉ. एहसान हा नीट परीक्षेचा जिल्हा समन्वयकही होता. सीबीआयने ओएसिस शाळा, हजारीबागचा व्हाईस प्रिन्सिपल इम्तियाज आलम याच्यासह एका पत्रकारालाही ताब्यात घेतले आहे.
सीबीआयने चौकशीसाठी या आरोपींना हजारीबागच्या गेस्ट हाऊसला नेलं होतं. सीबीआयने सुरुवातील एहसान-उल-हक याची याच गेस्ट हाऊसमध्ये चौकशी केली. मागच्या चार दिवसांपासून सीबीआयची टीम हजारीबागमध्ये नीट प्रश्नपत्रिका लीक प्रकरणात तपास करत आहे.
प्रिन्सिपल एहसान उल हकसोबत दोन पत्रकारांचे कनेक्शन असल्याचं सीबीआयला समजले होते. हे दोन्ही पत्रकार एका हिंदी दैनिकासाठी काम करत होते. सीबीआयची टीम ज्या पत्रकाराला पाटण्यात घेऊन येऊ शकते, त्याचं नाव सलाउद्दीन असे सांगितले जात आहे.
पत्रकार आणि प्रिन्सिपल यांच्यात पेपर लीक आणि नीट परीक्षेदरम्यान सातत्याने बोलणे होत होते. एहसान उल हक याचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर पत्रकाराला सीबीआयने चौकशीसाठी बोलावले होते. नीट पेपर लीक प्रकरणाच्या तपासादरम्यान बिहार पोलिसांना अटक केलेल्या उमेदवारांच्या घरातून अर्धे जळालेले पेपर सापडले होते, त्यात प्रश्नपत्रिकेच्या फोटोकॉपीही होत्या.