20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रपोलिस भरती प्रक्रियेला गालबोट, एकाचा मृत्यू

पोलिस भरती प्रक्रियेला गालबोट, एकाचा मृत्यू

नवी मुंबई : राज्यात पोलिस भरती प्रक्रिया राबवली जात असून अनेक जिल्ह्यांत भरती सुरू आहे. पोलिस प्रशासनाकडून पोलिस भरती अंतर्गत उमेदवारांच्या शारीरिक क्षमता चाचण्या घेतल्या जात आहेत. या दरम्यान नवी मुंबईत पोलिस भरती प्रक्रियेला गालबोट लागले असून पोलिस भरती चाचणी सुरू असताना सात तरुण मैदानात कोसळले तर त्यापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला तरुण पोलिस दलात भरतीसाठी जळगावहून नवी मुंबईत आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, शिनिवारी नवी मुंबईच्या बाळेगाव येथील एसआरपीएफ कॅम्पमध्ये पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी सुरू होत्या. यावेळी पुरुष उमेदवारांची ५ किलोमीटर धावण्याची चाचणी सुरू असताना चक्कर आल्याने सात तरुण मैदानात कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता २३ वर्षीय अक्षय बि-हाडे नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. अक्षय मूळचा जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचा रहिवासी होता.

शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, अक्षयच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तरुणांमध्ये प्रेम सुखदेव ठाकरे, अभिषेक शेटे, सुमीत किशोर अदाटकर, साहिल किशोर लावण, पवन शिवाजी शिंदे आणि अमित गायकवाड यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR