नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पदवी राष्ट्रीय चाचणी प्रवेश परीक्षा (नीट-यूजी) प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी गुजरातमधील सात ठिकाणी छापे टाकल्याची माहिती अधिका-यांनी दिली. आनंद, खेडा, अहमदाबाद आणि गोध्रा या चार जिल्ह्यांत संशयितांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. सीबीआयने शुक्रवारी झारखंडच्या हजारीबाग येथील एका शाळेचा मुख्याध्यापक, उपप्राचार्य आणि एका हिंदी वृत्तपत्राच्या पत्रकाराला अटक केली होती.
ओअॅसिस शाळेचे प्राचार्य एहसानुल हक यांना ‘एनटीए’द्वारे ५ मे रोजी घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी शहर समन्वयक म्हणून नियुक्त केले होते, तर उपप्राचार्य इम्तियाज आलम यांची एनटीएचे पर्यवेक्षक आणि ओअॅसिस शाळेचे केंद्र समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सीबीआय प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी जिल्ह्यातील आणखी पाच जणांची चौकशी करत आहे. पत्रकार जमालुद्दीन अन्सारी यांना मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापकांना मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
सरकारने खोटे सांगितले : काँग्रेस
गुजरातच्या गोध्रा येथील पेपरफुटीचे प्रकरण स्पष्ट झाले असूनही सरकारने सर्वोच्च न्यायालयात नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित अनियमिततेबाबत सर्वोच्च न्यायालयात खोटे सांगितले, असा दावा गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष शक्ती सिंह गोहिल यांनी केला आहे.
गोध्रा सत्र न्यायालयात दाखल प्रतिज्ञापत्राचा हवाला देत गोहिल यांनी सांगितले की, महाराष्ट्र, ओडिशा, बिहारसह अनेक राज्यांचे विद्यार्थी परीक्षेसाठी गोध्रात आले होते. कारण पेपरफुटीबाबत त्यांची येथे व्यवस्था केली होती.