केदारनाथ : वृत्तसंस्था
उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये रविवारी पहाटे हिमस्खलनाची धक्कादायक घटना घडली. मंदिराच्या पाठीमागे असलेल्या बर्फाळ डोंगरावरुन मोठ्या प्रमाणात बर्फ खाली आला. सुदैवाने या घटनेत जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. परंतु हिमस्खलनाचे दृश्य पाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या हृदयाचा ठोका मात्र चुकला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथ मंदिरामागील पर्वतांवर रविवारी सकाळी अचानक हिमस्खलन झाले. पहाटे ५.६ वाजता गांधी सरोवरच्या वरच्या भागातील डोंगरावरुन मोठ्या प्रमाणात बर्फ कोसळू लागला. सुदैवाने हा बर्फ मंदिरापर्यंत पोहोचला नाही. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, या टेकड्यांवर अनेकदा हिमस्खलन होत असते. पण, रविवारी झालेले हिमस्खलन फार मोठे नव्हते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.