22.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रसभापतिपदाची निवडणूक बिनविरोध घ्या

सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध घ्या

विधान परिषदेत ठाकरे गटाची महायुतीला ऑफर

मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषद सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध घ्या, अशी विनंती उबाठा गटाचे आमदार अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी केली. आपण नाव द्या आम्ही ते बिनविरोध देऊ, पण सभापतिपदाची निवडणूक याच अधिवेशनात घ्या, अशी विनंती उबाठा गटाच्या आमदारांनी केली.

दरम्यान, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे भाई जगताप, अभिजित वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभापतिपदाची निवडणूक कधी लावणार? हा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, या निवडणुकीवरून शिवसेना उबाठा गटाचे आमदार अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी मोठी वक्तव्ये केली आहेत.

विधान परिषद सभापतीकरता उबाठा गटातून शिवसेनेत आलेल्या उपसभापती नीलम गो-हे यांचे नाव चर्चेत आहे. अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी बिनविरोध सभापती निवडणूक घ्या असे बोलल्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सर्वांची एकत्रित बैठक लावली आहे. विधानसभेचे आजचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी १२ वाजता पुन्हा सुरू होणार आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधान परिषदेच्या सभापतिपदाचा मुद्दा उपस्थित केला. सभागृह संविधानाप्रमाणे चालले पाहिजे.

सभापतीची निवडणूक लावण्याबाबत ठराव मांडणार आहे, यावर आपल्याला चर्चा करावी लागेल, असे जयंत पाटील म्हणाले. गेली अनेक वर्षे सभापतिपद रिक्त आहे. एका मर्यादेपर्यंत तुम्ही उपसभापती असूनही सभापतिपदाचा चार्ज ठेवू शकता, असे जयंत पाटील म्हणाले. विधानमंडळाच्या सचिवांचे काम राज्यपालांना सभापतिपद रिक्त असल्याचे कळवणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले. तर भाई जगताप यांनी सभापतिपदाचा विषय हा महत्त्वाचा आहे. हे पद इतकी वर्षे रिकामे असताना आपल्या सचिवालयाने राज्यपालांना कळवले का याचे उत्तर तात्काळ हवे, अशी मागणी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR