28.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रफाटक्या साड्या वाटून त्यावर ठिगळे लावून काही होणार नाही  

फाटक्या साड्या वाटून त्यावर ठिगळे लावून काही होणार नाही  

मुंबई : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक योजनांची घोषणा केली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी जाहीर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मतांची पेरणी केली आहे.
याचदरम्यान अजित पवारांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. यावरून विरोधक सत्ताधा-यांवर तुटून पडत आहेत. अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आता महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, महिलांसाठी योजना जाहीर करून महायुती सरकारने प्रायश्चित घेतले आहे. महायुतीमधील एका नेत्याने बहीण-भावाच्या नात्यावर केलेले घाणेरडे वक्तव्य महायुतीला चांगलेच महागात पडले होते. राज्यात महिलांवर अन्याय-अत्याचार वाढले. गरीब महिलांना या सरकारने फाटक्या साड्या वाटल्या. या सगळ्याचे प्रायश्चित म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. गरीब माता-भगिनींना फाटक्या साड्या वाटून पुन्हा त्यावर योजनांची ठिगळं लावून काही उपयोग होणार नाही. राज्यातील महिला या सरकारला चांगलाच धडा शिकविणार आहेत.

दरम्यान, राज्यातील शेतकरी, महामंडळे, सारथी, बार्टी, महाज्योतीसारख्या संस्था यांच्यासाठी योजना जाहीर केल्या. परंतु हे लबाडाचे आमंत्रण आहे. ते जेवल्यावरच खरं मानावं लागेल. त्यामुळे या फसव्या तरतुदींना भुलून जाऊ नये. कारण अर्थसंकल्प सादर करायचा आणि त्याची अंमलबजावणी करताना जुमलेबाजी करायची हा या सरकारचा शिरस्ता आहे. कालचा आर्थिक पाहणी अहवाल पाहिल्यावर मान शरमेने खाली जाईल, अशी परिस्थिती दिसून आली, अशी टीका देखील त्यांनी केली.

तर महाराष्ट्राला गुजरातने मागे टाकल्याचा पुरावा म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल होता. दिल्लीश्वरांनी महायुतीला सत्ता मिळवून दिल्यावर त्यांनी महाराष्ट्राला गुजरातच्या मागे ठेवायचं काम महायुतीला दिलं होतं. हे काम या सरकारने चोख बजावले आहे. सुरतमधल्या पाहुणचारावेळी दिलेल्या कानमंत्रानुसार महाराष्ट्राला या महायुतीने खड्ड्यात घातले आहे. गुजरातच्या खाल्ल्या मिठाला जागणारे हे सरकार महाराष्ट्राचं भलं करू शकत नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR