पुणे : प्रतिनिधी
रविवार, ३० जून रोजी पुण्यनगरीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे मनोमिलन झाले. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळिराजाला सुखावू दे ही प्रार्थना. विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण-भाऊ सगळे आठवायला लागले आहे. सध्या जुमल्यांचा पाऊस पडतो आहे. सरकारकडून वारक-यांच्या दिंड्यांना दिले जाणार अनुदान केवळ जुमला आहे. तीन महिन्यांवर निवडणुका आल्यामुळे सरकार काय काय देईल हे आता बघावे लागेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मागील सव्वा वर्षापासून राज्याच्या गृह विभागाचा कारभार बिघडला आहे, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. बीडमधील तणावग्रस्त परिस्थितीवर सुप्रिया सुळे यांनी गृह विभागाचे अपयश म्हणत निशाणा साधला. तसेच एक भारतीय म्हणून वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद आहे मात्र सगळे श्रेय क्रिकेट खेळणा-या खेळाडूंचे आहे, असे देखील त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.