पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात दाखल होणा-या पालखी सोहळ्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. रविवार, दि. ३० जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दाखल झाला. यासाठी २ जुलैपर्यंत वारक-यांच्या मुक्काम ठिकाणी तब्बल ७५० कर्मचारी तीन शिफ्टमध्ये स्वच्छतेसाठी तैनात करण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्यासोबत येणा-या वारक-यांसाठी सुमारे १,६९५ मोबाईल टॉयलेट शहराच्या वेगवेगळ्या भागांत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
शहरात ज्या भागात दिंड्या मुक्कामी असतात, अशा भागांत क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार ही मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
५० हजार सॅनिटरी नॅपकिनचे वाटप
वारीमध्ये सहभागी महिलांसाठी ५० हजार सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले जाणार आहे. राज्य महिला आयोगाच्या आदेशानुसार मागील वर्षीपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पालखी मुक्काम परिसरात महिलांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी महिलांना या नॅपकिनचे वाटप केले जाणार आहे. तसेच महिलांसाठी वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महापालिकेची तयारी
– दोन दिवस शहरात तीन वेळा सार्वजनिक स्वच्छता
– पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ७०० स्वच्छता सेवकांची नेमणूक
– जेटिंग मशिनद्वारे तीन वेळा स्वच्छतागृहांची स्वच्छता
– शाळांमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी महिलांसाठी न्हाणीघराची सुविधा
– वारकरी मुक्काच्या ठिकाणी औषधांची फवारणी.