छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
जे दोन वर्षे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होते, त्यांनी शिवसेना फोडण्याचे, गद्दारीचे काम केले. सध्याच्या सरकारचे दोन वर्षे हे खोक्याचे, टक्केवारीचे, महाराष्ट्राला अधोगतीला नेणारे आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. सरकारच्या दोन वर्षांच्या कालावधीविषयी बोलताना अंबादास दानवे यांनी हे विधान केले.
माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, लाडकी बहीण योजना जाहीर केली. परंतु अटी, शर्थींमुळे फार मोजक्या महिलांना योजनेची मदत मिळेल. शेतक-यांसाठी घोषणा केल्या. परंतु १५ हजार कोटी रुपये शेतक-याचे देणे आहे. राज्यात २५ हजार कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प असताना विविध घोषणांची अंमलबजावणी कशी होईल, असा प्रश्न आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात विजेचा दर जास्त आहे. ग्रामीण भागात २ ते ४ तासांवर वीज मिळत नाही.
विजेची कमतरता आहे. वीज मिळतच नाही, मोफत विजेचा काय फायदा होईल, हे येणा-या काळात दिसेल. शेतक-यांना दिलेल्या मोफत विजेची घोषणा फार्स ठरण्याची शक्यता आहे. सरकारकडे असलेली वीज आणि शेतक-याला लागणारी वीज याचे प्रमाण काढले तर शेतक-याला वीज मिळणे अवघड आहे, असे अंबादास दानवे म्हणाले. पीक विमा एक रुपयात देण्याची घोषणा सरकारने केली.
शेतक-यांचा वाटा सरकारने भरला. परंतु पीक विमा कंपन्यांची दादागिरी वाढली आहे. महाज्योती, सारथी, बार्टी या सगळ्या योजनांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. विद्यार्थ्यांना सवलती मिळालेल्या नाहीत. दुधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय हा शेतक-यांच्या विरोधातील असल्याचेही दानवे म्हणाले.