मिरा रोड : वृत्तसंस्था
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्राईम युनिट १ ने अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या मोठ्या ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात यश आले आहे. याप्रकरणी महाराष्ट्रातून ३, तेलंगणातून ३, उत्तर प्रदेशातून ८ आणि गुजरातहून १ असे १५ आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्याकडून ३२८ कोटीचे एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ, कच्चे एम.डी. आणि एम.डी. बनवण्यासाठी लागणारे केमिकल्स, साहित्यासोबतच ३ पिस्टल, १ रिवॉल्वर आणि ३३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. आज पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
क्राईम युनिट १ ने द्वारका हॉटेल येथे आरोपी शोएब हनीफ मेमन आणि निकोलस लिओफ्रेड टायटस यांना पकडले असता त्यांच्याजवळून २ कोटी किंमतीचे एम.डी. ड्रग्स मिळून आले. आरोपी शोएबने दिलेल्या माहितीनुसार आरोपी दयानंद उर्फ दया माणिक मुद्दनार आणि नासीर उर्फ बाबा जानेमियॉ शेख यांना हैद्राबाद येथून या दोघांना अटक केली. यातील दयानंद उर्फ दया याची नरसापुर जिल्हा विकाराबाद तेलंगणा येथे एम.डी. बनविण्याची फॅक्टरी आढळली.
आरोपी दयाने दिलेल्या माहितीनुसार घनश्याम रामराज सरोज याला वाराणसी येथून ताब्यात घेतले. त्याचबरोबर मोहम्मद शकील मोहम्मद मोईन तेलंगणात राहणा-याला मुंबईच्या गोरेगाव येथून त्याच्या स्विफ्ट कारसह ताब्यात घेतले.
पोलिसांना त्यानंतर ही तपासामध्ये एम.डी. बनवण्यासाठी लागणारे पैसे व एम.डी. विकून मिळालेले पैसे याची देवाण-घेवाण करणारा दाउदचा मुख्य हस्तक सलीम डोळा याची ल्ािंक लागली. तोच धागा पकडत गुजरातच्या सुरत येथे राहणारा आरोपी झुल्फीकार उर्फ मुर्तुझा मोहसीन कोठारी याच्याकडे पाठविलेली १० लाख ८४ हजार रोख रक्कम जप्त केली.
उत्तर प्रदेशाच्या आजमगड येथून आरोपी सलीम डोळा आणि दया याचे साथीदार आरोपी अमिर तौफीक खान, त्याचा भाऊ बाबू तौफीक खान याचे साथिदार मोहम्मद नदीम शफिक खान, एहमद शाह फैसल शफीक आझमी यांना अटक करुन त्यांच्याकडून ३०० कोटीकिंंमतीचे १२ कच्चे एम.डी. चे ड्रम जप्त केले. याच गुन्हयातील अमिर तोफीक खान, मोहम्मद शादाब मोहम्मद शमशाद खान आणि अलोक विरेंद्र स्ािंह यांना उत्तर प्रदेशातील लखनउ येथून अटक केली. यातील आरोपी अमिर खान याने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश येथे राहणार अभिषेक उर्फ शुभम नरेंद्रप्रताप सिंह याला नालासोपारा येथून अटक केली.