18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमी कोणताही पक्ष बदललेला नाही, जनता हाच पक्ष!

मी कोणताही पक्ष बदललेला नाही, जनता हाच पक्ष!

अजित पवारांकडून जनतेला भावनिक साद! अर्थसंकल्पातील विविध मुद्यांवर भाष्य

मुंबई : राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही. पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो आणि आजही जनतेचाच आहे, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. अजित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे एक व्हीडीओ ट्विट केला आहे. या व्हीडीओत अजित पवार हे राज्यातील जनतेला भावनिक साद घालताना दिसत आहेत. तसेच, या व्हीडीओद्वारे राज्यातील अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांनाही टोला लगावला आहे.

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी अजित पवारांनी विशेष व्हीडीओ संदेश जारी करत विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात पाहिले तर अजित पवार अशाप्रकारे विशेष कॅमेरा सेटअप लावून व्हीडीओद्वारे माहिती देताना दिसून आले नाहीत. मात्र, रोखठोक आणि परखड बोलण्याची शैली असलेल्या अजित पवार यांनी अशाप्रकारे प्रसिद्ध केलेल्या व्हीडीओमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राज्यातील प्रत्येक महिला आर्थिक सामाजिक दृष्ट्या सक्षम व्हावी, स्वत:च्या पायावरती उभे राहावी. कुठल्याही महिलेला असे वाटू नये की, आपण दैनंदिन गरजांसाठी वडील भाऊ किंवा नव-यावर अवलंबून आहोत. त्यामुळेच ज्यावेळी माझी लाडकी बहीण योजनेचा विचार करतो तेव्हा मलाही योजना म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकण्यात आलेले अत्यंत क्रांतिकारी पाऊल वाटते. आमच्या सरकारने आपल्या अनुभवाच्या जोरावर हे अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवलेले आहे. एवढेच नाही तर राज्यातील माता-भगिनींनी पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागे राहणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी इतर अनेक पावलं उचलण्यात आलेली आहेत. अर्थसंकल्पात राज्यात २५ हजार नवीन उद्योगांच्या उभारणीसाठी देखील आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

ऐतिहासिक अर्थसंकल्पाचा अभिमान
माझ्या महाराष्ट्रवासीयांनो, मी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केलेला आहे तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच. राज्याच्या अशा प्रकारच्या ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचा भाग्य मला लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे. या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून राज्यातील २१ ते ६० वयोगटातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात तर मला दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेवर राज्य सरकार प्रतिवर्षी ४६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

माता-भगिनींची विवंचना दूर होणार
आजवर आपण पाहत आलो आहोत की प्रत्येक कुटुंबातील आई स्वत:वरील खर्च शक्य तितकी काटकसर करते, पण आपल्या मुलाबाळांना काही कमी पडणार नाही, याची काळजी ती घेते. परंतु काही वेळा परिस्थितीशी अशी निर्माण होते की आर्थिक अडचणीमुळे घरातील मुलांच्याकडे जास्त लक्ष दिले जाते आणि नेमके मुलींकडे दुर्लक्ष होते. मात्र, आता मला आशा आहे की माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून मिळणा-या अर्थसाहयाच्यामुळे राज्यातील माता-भगिनींची ही विवंचना दूर होईल.

वारकरी बांधवांच्या पाठीशी
राज्यातील वारकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे आणि वारकरी सांप्रदायची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे नेणे यासाठी मी आणि राज्य शासन बांधिल आहे. तुम्ही पाहिले असेलच की अनेक नकारात्मक, निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करतात, त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचे सांगितले जात आहे. काहींकडून या बजेटला ‘लबाडाच्या घरचं आवतान’ आणि अजूनही बरीच नावे ठेऊन हिणवले जात आहे. मला फक्त इतकंच सांगायचंय की या लोकांमध्ये आणि तुमच्या अजित दादामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणारे आणि तुमचा दादा काम करणारा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR