29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्ररेती तस्करांवर गावक-यांचा हल्ला

रेती तस्करांवर गावक-यांचा हल्ला

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील धोपटाळा येथे गावक-यांनी ट्रॅक्टरद्वारे रेती तस्करी करणा-यांवर अचानक हल्ला चढविला. दरम्यान दगडफेक केली. यामध्ये ट्रॅक्टरवरील एक जण ठार झाला तर अन्य चारपैकी दोन जण जखमी झाले. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी गुरुवारी सकाळी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.

मोहम्मद शहादत खान (५२) असे मृतकाचे नाव आहे. जखमींमध्ये ट्रॅक्टर मालक देविदास येवले (४७) व मजूर कैलास कुळसंगे (३०) यांचा समावेश आहे. तर रोशन बावणे(२८) बंडू कुकर्डे (४०) हे हल्ल्यातून थोडक्यात बचावले. प्राप्त माहितीनुसार, राजुरा येथून पाच जण ट्रॅक्टरने सास्तीजवळील धोपटाळा नाल्यावर बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास रेती तस्करीसाठी गेले होते. ही बाब हेरून आधीच गावक-यांनी त्यांना पकडून आणण्याचा बेत आखला होता. ट्रॅक्टर रेती घाटावर पोहचली. यानंतर गावक-यांनी अचानक त्यांच्यावर धावा केला.

ट्रॅक्टरमध्ये सुमारे दोन ते तीन घमेले रेती टाकण्यात आली होती. यानंतर गावक-यांनी ट्रॅक्टरसह सर्वांना धोपटाळा येथील चौकात आणले. नंतर आमच्या गावातून रेती चोरता असे म्हणत अचानक त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये एक जण छातीवर दगड लागल्याने खाली कोसळला. ट्रॅक्टरमधील इतर दोन जण जखमी झाले होते. जखमी व इतर दोघांनी जमिनीवर कोसळलेल्या मजुराला ट्रॅक्टरमध्ये टाकून राजुरा ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेने रेती तस्करांमध्ये चांगलीच दहशत पसरल्याचे बोलले जात आहे. पुन्हा एकदा रेती तस्करीचा विषय ऐरणीवर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR