17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरसंभाजीनगर येथे भाजपला खिंडार

संभाजीनगर येथे भाजपला खिंडार

ठाकरे गट हादरा देण्याच्या तयारीत ६ नगरसेवक, पदाधिकारी पक्ष सोडणार

छ. संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत ९ जागा जिंकून राज्यात दुस-या क्रमांकावर राहिलेली ठाकरेसेना आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागली आहे. यंदाच्या लोकसभेला छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेचे उमेदवार पराभूत झाले. पण विधानसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे ६ ते ८ नगरसेवक आणि पदाधिकारी ठाकरेसेनेच्या वाटेवर आहेत. मंत्री अतुल सावेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमधून शिंदेसेनेचे संदीपान भुमरे निवडून आले. मराठावाड्यात महायुतीला केवळ संभाजीनगरात यश मिळाले. पण आता तिथेच भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आम्ही काय जिल्ह्यात केवळ शिंदेसेनेचे काम करायचे का? असा सवाल नाराज नेते आणि पदाधिकारी विचारत आहेत. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी ठाकरेंना साथ द्या. ओरिजिनल शिवसेनेत प्रवेश करा, अशी लोकांची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते राजू शिंदे यांनी दिली.

राजू शिंदेंनी २०१९ मध्ये औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी ४३ हजार ३४७ मतं मिळाली होती. शिवसेनेचे संजय शिरसाट इथून विजयी झाले होते. ते सध्या शिंदेसेनेत आहेत. त्यांच्याकडून ठाकरेंवर सातत्याने टीका केली जाते. उद्धव ठाकरे भाजपच्या नगरसेवकांना गळाला लावून शिंदेसेनेलाही मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आम्ही लोकसभेला शिंदेसेनेच्या उमेदवाराचे काम केले. पण त्यांनी त्याबद्दल साधी कृतज्ञताही व्यक्त केली नाही. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून आम्ही लोकसभेची तयारी करत होतो. पण जागावाटप संभाजीनगरची जागा शिंदेसेनेला सोडण्यात आली. आता आम्ही काय फक्त शिंदेसेनेचे काम करायचे का, असा सवाल भाजपच्या नाराज पदाधिकारी आणि नेत्यांचा आहे.

७ जुलैला प्रवेश
येत्या ७ तारखेला भाजपचे ६ ते ८ नगरसेवक, पदाधिकारी ठाकरेसेनेत प्रवेश करतील. यात उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांचाही समावेश आहे. भाजपला खिंडार पाडून शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचीही कोंडी करण्याची चाल ठाकरे खेळत आहेत. गेल्या निवडणुकीत शिरसाटांविरोधात अपक्ष लढून ४० हजारांपेक्षा अधिक मते घेणा-या राजू शिंदेंना पक्षात घेऊन शिरसाटांविरोधात उमेदवारी दिली जाऊ शकते. शिरसाट मतदारसंघात नसतात, ते केवळ मुंबईत असतात, यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR