लातूर : प्रतिनिधी
नीट २०२४ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहचल्याने देशभरात चर्चेला आलेल्या लातूरात दाखल झालेल्या सीबीआय पथकाने आरोपींना ताब्यात घेत या प्रकरणाचा लातूरात विविध अंगाने तपास सुरु केला आहे. मागच्या चार दिवसांच्या तपासानंतर तो पुर्ण झालेला नाही त्यामुळे आज दि. ६ जुलै रोजी आरोपींची सीबीआय कोठडी संपत असल्याने सीबीआय संशयीत आरोपींना न्यायालयासमोर हजर करुन परत पाच दिवसाची सीबीआय कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे.
येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पेपरफुटीच्या नवीन कायद्यानुसार संजय जाधव व जलीलखॉ पठाण, ईरन्ना मष्णाजी कोनगलवार मुळ रा. देगलूर, जि. नांदेड व दिल्ली येथील गंगाधर मुंढे नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल आहे. या चार संशयीत आरोपी पैकी संजय तुकाराम जाधव व जलीलखाँ उमरखान पठाण यांना पोलीसांनी गजाआड केले असून ते सध्या सबीआयच्या कोठडीत आहेत. तर या गुन्ह्यात मुख्य सुत्रधार असलेला ईरन्ना मष्णाजी कोनगलवार ंहा आपल्या कुटूंबासह अद्यापही फरारच आहे. तर दिल्लीच्या गंगाधर नामक आरोपीला सीबीआयने ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
संशयीत आरोपी संजय तुकाराम जाधव व जलीलखाँ पठाण यांना मंगळवारी सीबीआय कोठडी सुनावल्यानंतर सीबीआयने लातूरात विविध अंगाने तपास सुरु केला आहे. तो अद्याप तरी पुर्ण झालेला नाही. या चार दिवसाच्या कालावधीत सीबीआयने पोलीस, एटीएसने केलेल्या तपासाची पडताळणी केली असून सीबीआय व पोलीस कोठडीत संशयीत आरोपीकडून इतर तिघा संशयीतांची जी नावे समोर आली आहेत त्यांची चौकशी करीत आहे. तसेच सीबीआयने फरार असलेल्या इरण्णा कोनगलवार याच्या घराची इन-कॅमेरा झडती घेतली असली तरी तपास पुर्ण झालेला नाही. अजून ही सीबीआयला चौकशीसाठी संशयीत आरोपींचा कोठडीची आवश्यकता आहे. त्यामुळे सीबीआय आज त्यांच्या कोठडीतील संशयीत आरोपी संजय तुकाराम जाधव व जलीलखॉ पठाण यांना न्यायालयासमोर हजर करून त्याच्या कोठडीत वाढ करावी, अशी मागणी करण्याची शक्यता आहे.सीबीआयने तशी मागणी केल्यास न्यायालय त्यांना परत कोठडी सुनावते का ते आज स्पष्ट होणार आहे.