लातूर : प्रतिनिधी
लातूरमधील पु. अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात धनगर समाजाच्या बांधवांचे गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून राज्य सरकारने या उपोषणाची तातडीने दखल घ्यावी आणि सरकारचे शिष्टमंडळ नेमून त्यांनी उपोषणकर्त्या समाजबांधवांची भेट घ्यावी, अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी केली.
पावसाळी अधिवेशन सुरु असून यात लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी लातूरात सुरु असलेल्या धनगर समाज बांधवांच्या उपोषणाकडे सरकारचे लक्ष वेधले. आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून हे उपोषण सुरु आहे. उपोषणकर्त्या समाजबांधवांची आता प्रकृती ढासळत आहे. त्यामुळे सरकारने या विषयाचे गांभीर्य ओळखून समाज बांधवांची तातडीने दखल घेतली पाहिजे. त्यांचे प्रश्न जाणून घेवून त्यांना दिलासा दिला पाहिजे, असे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.
सकल धनगर समाजाच्या वतीने लातूरात गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच दोन तरुणांचे उपोषणही सुरु आहे. आरक्षणासह अनेक न्याय्य मागण्या समाजाच्या वतीने सरकारकडे करण्यात आल्या आहेत. पण सरकारने अद्याप या उपोषणाची दखल घेतली नाही. यापूर्वी सरकारतर्फे धनगर समाजाला आरक्षण देवू, अशी घोषणाही झाली आहे. ती अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सरकारने तातडीने समाज बांधवांना दिलासा द्यावा. समाजासमाजात वाढत असलेले तेढ कमी करावे, याकडेही आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी लक्ष वेधले.