24.8 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeलातूरचिमुकल्यांनी लावले ‘आई’च्या नावाने वृक्ष  

चिमुकल्यांनी लावले ‘आई’च्या नावाने वृक्ष  

लातूर : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशवासीयांनी आपल्या आईच्या नावाने एक वृक्ष लावा असे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने सरस्वती कॉलनी येथील शिवाजी विद्यालयात दि. ६ जुलै रोजी ‘एक विद्यार्थी : एक वृक्ष’हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक फळझाडे वितरीत करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात आईच्या नावाने एक झाड शाळेच्या परिसरात लावण्यात आले. बाकी विद्यार्थ्यांना वृक्ष लावण्यासाठी देण्यात आले.
वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी सकाळी शिवाजी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना आंबा, पेरु, आवळा आदी रोपांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक एस. वाय. कुलकर्णी, उपमुख्याध्यापक डी. आर. गुरमे, पर्यवेक्षिका एस. टी. झिरमिरे, पर्यवेक्षक प्रवीण घोरपडे, शिक्षक उमाकांत जाधव, कला शिक्षक अशोक तोगरे यांच्यासह वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, उपाध्यक्ष रामेश्वर बावळे, कार्याध्यक्ष अमोलआप्पा स्वामी, अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. अजित चिखलीकर, राहुल माशाळकर, उमेशआप्पा ब्याकोडे, योगेश चांदोरीकर, मोहिनी चांदोरीकर आदींनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यापूर्वी शाळेच्या वतीने सर्व्हे करण्यात आला. वर्गशिक्षकांनी ज्या विद्यार्थ्याच्या घरी वृक्ष लावण्यासाठी जागा आहे, जे पालक वृक्ष लागवड आणि संवर्धन करू इच्छितात, त्यांच्या घरी कोणते झाड हवे आहे या सर्व गोष्टींची माहिती घेतली. शाळेने विद्यार्थ्यांना रीतसर नोटीस काढून वृक्ष लागवड आणि संवर्धन होईल या दृष्टीने आवश्यक असलेली माहिती घेऊन ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनाच वृक्ष वाटप करण्यात आले. शिवाय, वृक्ष विद्यार्थ्यांना दिल्यानंतर त्या झाडाचे रोपण करून त्या झाडासोबत सेल्फी घेऊन तो शाळेच्या व्हॉट्स अप ग्रुपवर टाकण्याच्या सूचना दिल्या. ६ जुलै रोजी दिवसभरात विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी वृक्ष लागवड करून फोटोज् ग्रुपवर अपलोड केले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे महत्त्व रुजावे यासाठी १० वर्षांपासून वसुंधरा प्रतिष्ठान विविध शाळेत जाऊन जनजागृती करते आहे. वृक्ष लागवड आणि संवर्धन ही विद्यार्थी चळवळ होणे अपेक्षित आहे. यावर्षी शिवाजी शाळेत ज्या विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले आहेत.
जे विद्यार्थी वृक्षांचे संवर्धन करतील अशा विद्यार्थ्यांचा पुढील वर्षी ६ जुलै रोजी वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शाळेच्या वतीनेही वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR