21.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयनीट-यूजी समुपदेशन स्थगित

नीट-यूजी समुपदेशन स्थगित

एमबीबीएस, बीडीएसचे प्रवेश लांबणीवर? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नीट-यूजी काऊन्सिंलिंग पुढील सूचना येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे एमबीबीएस आणि बीडीएस अंडरग्रॅज्यूएट मेडिकल कोर्सची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार नाही. गेल्या काही दिवसांपासून नीट-यूजी परीक्षेसंदर्भात वातावरण तापले आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीही सुरू आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या ८ जुलैच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नीट-यूजी काऊन्सिलिंग आयोजित करणा-या मेडिकल काऊन्सिलिंग कमेटीने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. पण कोणत्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला, याबाबत समितीने सांगितलेले नाही. यासंदर्भात एमसीसी लवकरच पुढील सूचना जारी करणार असल्याची माहिती मिळत आहे. नीट-यूजी काऊन्सिलिंग ६ जुलै रोजी होणार होती. पण अचानक या संदर्भातील निर्णय घेण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित अधिकारी सुप्रीम कोर्टातील ८ जुलैच्या सुनावणीकडे लक्ष ठेवून आहेत. यापूर्वी दोनवेळा नीट-यूजी स्थगित करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. पण कोर्टाने काऊन्सिलिंगवर स्थगिती आणण्यास नकार दिला होता. सुप्रीम कोटाने म्हटले होते की, आम्ही काऊन्सिलिंगवर स्थगिती आणू शकत नाही. कारण परीक्षा सुरू आहेत. मात्र, आता अचानक काऊन्सिलिंगला स्थगिती दिल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

५ मे रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेत अनियमितता आढळून आली होती. एकाच केंद्रावरील अनेक विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळाले होते. तसेच पैसे घेऊन पेपर फोडण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात पुढे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी
होते ऑनलाईन काऊन्सिलिंग
भारतात मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन काऊन्सिलिंगची प्रक्रिया आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नीट-यूजी परीक्षा पास केली, अशा विद्यार्थ्यांसाठी एमसीसी दरवर्षी ऑनलाईन नीट यूजी काऊन्सिलिंगचे चार राऊंड आयोजित केले जातात.

जुलैअखेर सुरू
होणार समुपदेशन?
पेपर लिक प्रकरणामुळे वादात अडकलेल्या नीट-यूजी विरोधातील याचिकांवर ८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे नीट-यूजीचे समुपदेशन जुलै महिन्याच्या अखेरीस सुरू होऊ शकते, असे संकेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. यासंदर्भात लवकरच तारीख जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले. गेल्या वर्षीदेखील २० जुलैनंतरच समुपदेशन झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR