मुंबई : नवी मुंबई, रायगड, सिंधुुदुर्ग परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. याच पावसाचा परिणाम आता कोकण रेल्वेवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणात जाणा-या सर्व गाड्या रखडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुंबईकडे येणारी मेंगलोर एक्सप्रेस रखडली आहे.
आटगाव वाशिंद दरम्यान ट्रॅकवर झाड पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे खडवली स्टेशन दरम्यान रेल्वेट्रॅकवरील खडी व माती वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. कसा-यावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणा-या अप साईडच्या गाड्या पूर्णपणे विस्कळीत असून स्थानकादरम्यान अनेक एक्सप्रेस व ट्रेन एकामागे एक उभ्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्या वसई दिवा मार्गे वळवण्यात आल्या आहेत. नवी मुंबईसह पनवेलमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचण्यास सुरवात झाली आहे.
आदई, सुकापूर भागातील गावात पाणी भरु लागले आहे. रस्त्यावर, सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पनवेल आदई, सुकापूर भागात सोसायटी, घरात पाणी घुसले आहे. गाड्या पाण्यात अर्ध्या डुबल्या आहेत. सोसायटीतील रहिवाशांना घराबाहेर पडण्यात अडचणी येत आहेत. कमरेपर्यंत पाणी साचले आहे. कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कळंबोली भागात पुराचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गाड्या अडकल्या आहेत. कार, परिवहन बस बंद पडल्या आहेत. रहिवाशांचे हाल होतायेत.
शहापूरमधील गुजरातीबाग, चिंतामणनगर, ताडोबा परिसर आणि गुजरातीनगर या परिसरामध्ये भारंगी नदीचे पाणी घुसल्याने पाच ते सहा फोर व्हीलर आणि वीस ते पंचवीस टू व्हीलर या वाहून गेल्या आहेत. त्यानंतर अनेक फोर व्हीलर आणि टू व्हीलर चे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घरांमध्ये साधारण तीन फुटापर्यंत भारंगी नदीच्या पुराचे पाणी गेले आहे. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
स्थानिक नागरिकांची मागणी आहे की गुजराती बाग आणि चिंतामणी नगर या परिसरामध्ये नदीला बांधण्यात आलेली संरक्षण भिंतीमुहे खाली जाणारे पाणी हे अडून राहते आणि त्यामुळे येथील भागाला पुराचा फटका बसलेला आहे. नगरपंचायत आणि काही ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगणमताने यांच्या फायद्यासाठी हे नदीला संरक्षण कटरे बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचेमोठे नुकसान झाले आहे. हा कटरा त्वरित तोडण्यात यावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे.