इंदापूर : अकोले (ता. इंदापूर) गावाच्या हद्दीत काझड व अकोले गावाच्या सीमेवरील नीरा-भीमा जोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या शाफ्ट क्रमांक चारमध्ये विद्युत पंपाची पाहणी करताना २७४ फूट खोल बोगद्यात पडून दोन शेतक-यांचा मृत्यू झाला. रतिलाल बलभीम नरुटे (वय ५०) व अनिल बापूराव नरुटे (वय ३५) अशी त्यांची नावे आहेत. ते काझडचे (ता. इंदापूर) रहिवासी आहेत. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, निवासी तहसीलदार अनिल ठोंबरे भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप पवार, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे व उपनिरीक्षक अतुल खंदारे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधकार्यासाठी लोणी एमआयडीसीतून क्रेन मागविली. हा बोगदा सुमारे २७४ फूट खोल असल्याने मदतकार्यास वेळ लागला.
क्रेनच्या साहाय्याने सुरुवातीला पाळणा मोकळा सोडण्यात आला व पुन्हा बाहेर काढण्यात आला. त्यावेळी पाळणा थोडा तिरका होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाळणा पुन्हा बांधून सोडण्यात आला. राहुल नरुटे, हनुमंत वीर, रणजित नरुटे हे तीन स्थानिक युवक क्रेनच्या साहाय्याने मदत कार्यासाठी बोगद्यामध्ये गेले होते.