लातूर : प्रतिनिधी
ट्रकवर सोबत गेलेल्या व्यक्तीच्या खुन प्रकरणी लातूर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने एकाला पाच वर्षांची तर दुस-याला तीन वर्षांची सक्तमजूरी आणि दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. या खटल्यात एकुण १९ जणांची साक्ष महत्वपुर्ण ठरली आहे.
चाकुर तालुक्यातील अलगरवाडी येथील ज्ञानेश्वर देवकते हा गावातील अलंकार केंगार याच्यासोबत ट्रकवर जातो म्हणून २२ मे २०२१ रोजी अलगरवाडी पाटीकडे गेला. २५ मे २०२१ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास अलंकार केंगार, सचिन घुमे यांनी ट्रकच्या केबिनमध्ये ज्ञानेश्वर यास हात-पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत घेऊन आले. ज्ञानेश्वरचा भाऊ ज्ञानोबा देवकते, चैतन्य देवकते याच्याकडे ते ट्रक देऊन निघून गेले. ज्ञानेश्वर याचे हात-पाय थंड होते. डोक्यात जखमा होत्या. त्याच्यावर चुना लावला होता. शिवाय शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या.
मयताचा भाऊ ज्ञानोबा देवकते याने चाकुर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन सचिन घुमे, अलंकार केंगार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चाकुर येथील पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सूर्यवंशी यांनी तपास पुर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची जिल्हा सत्र न्यायालयासमोर सुनावणी होऊन न्यायाधीश डी. बी. माने यांनी आरोपी अलंकार केंगार याला पाच वर्षे सक्तमजूरी, पाच हजार रुपये दंड तर सचिन घुमे याला तीन वर्षे सक्तमजूर व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सूनवली. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील विठ्ठल देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. परमेश्वर तल्लेवाड यांनी सहकार्य केले. कोर्ट पैरवी चाकुरचे पोलीस हवालदार सी. जी. राचमाले यांनी केली.