23.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeसंपादकीयगर्दी तेथे चेंगराचेंगरी!

गर्दी तेथे चेंगराचेंगरी!

अत्रे तेथे हशा, हशा तेथे टाळ्या, बुवा तेथे बायाच्या चालीवर गर्दी तेथे चेंगराचेंगरी ही आलीच. नुकतेच हाथरस येथील दुर्घटनेत ते दिसले आणि गुरुवारी विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी उसळलेल्या जनसुनामीतही त्याचा प्रत्यय आला. कुठलेही आयोजन करायचे तर त्या संदर्भात योजना आखून पूर्ण नियोजन करण्याची गरज असते. ते जर नसेल तर योजना फसते, वेळेचा अपव्यय होतो, श्रम वाया जातात, पैशाची नासाडी होते, उद्दिष्ट अपूर्ण राहते आणि त्याचे दूरगामी परिणाम निरपराधांना भोगावे लागतात. टीम इंडियाच्या स्वागत प्रसंगी दुर्घटना घडली नाही ही आनंदाची गोष्ट. बार्बाडोसमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करून टीम इंडियाने टी-२० विश्वकप जिंकला आणि देशभरात जल्लोष झाला. भारतीय संघाचे गुरुवारी मायदेशात आगमन झाले. मुंबईत त्यांच्या स्वागतासाठी लाखो मुंबईकरांनी मरीन ड्राईव्हवर गर्दी केली होती. लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी रस्त्यावर उतरले होते. वानखेडे स्टेडियमही चाहत्यांनी खच्चून भरले होते. मात्र, मरीन ड्राईव्हवरील रॅलीला, त्यांच्या आनंदाला गालबोट लागलेच. कारण तेथील तुफान गर्दीमुळे अनेकांना त्रास झाला, ब-याच जणांचे श्वास कोंडले, गुदमरू लागल्याने त्यांची तब्येत बिघडली. अनेकांच्या हातापायाला दुखापत झाली.

जखमींपैकी काहींना व्हीटी येथील जीटी रुग्णालयात नेण्यात आले. गर्दीमुळे काहींना गुदमरल्यासारखे वाटू लागले तर काही जण बेशुद्धही झाले. प्रचंड गर्दीमुळे एक तरुणी बेशुद्ध झाली. तेथील एका पोलिस कर्मचा-याने तिला खांद्यावर टाकले आणि गर्दीतून वाट काढत उपचारासाठी रुग्णालयात नेले. विजयी रॅली पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना अवघड झाले. त्यामुळे लाठीमार करावा लागला. अनेक चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी धडपडत होते. त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. भारतीय खेळाडूंनी क्रिकेट रसिकांच्या उत्साहाला मनापासून दाद दिली. मात्र, हा उत्साह काही चाहत्यांना त्रासदायक ठरला. मिरवणुकीनंतरचे चित्र धक्कादायक होते. मिरवणुकीच्या मार्गावर चपला विखुरल्या होत्या. मरीन ड्राईव्हवर आजूबाजूला उभ्या असलेल्या गाड्यांच्या छतांचे नुकसान झाले होते. चाहते कारच्या छतावर उभे राहून नाचत होते. त्यामुळे गाड्यांचे नुकसान झाले. गर्दी वाढत गेल्याने ती नियंत्रणाबाहेर गेली.

त्यामुळे पोलिसांना परिस्थिती हाताळता आली नाही. टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी लोक मरीन ड्राईव्हवर येत असल्याने चर्चगेट स्थानकात मोठी गर्दी झाली. मुंबईच्या रस्त्यावर प्रचंड संख्येने जमलेल्या क्रिकेटप्रेमींची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. वरळी ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी रॅली काढण्यात आली होती. चाहत्यांना वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्यात आला होता. स्टेडियमची आसनक्षमता ३५ ते ४० हजारांची असताना त्यापेक्षा अधिक क्रिकेटप्रेमी आतमध्ये उपस्थित होते. जितके चाहते स्टेडियममध्ये होते त्यापेक्षा अधिक स्टेडियमच्या बाहेर आणि रस्त्यावर होते. पावसाची रिमझिम सुरू असतानाही मुंग्यासारखे लोक रस्त्यावर दिसत होते. असो. गत काही वर्षांत देशात चेंगराचेंगरीच्या घटना का घडत आहेत आणि त्यात निष्पापांचे बळी का जात आहेत यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. मग ती घटना एखाद्या धार्मिक कार्यक्रमातील असो, रेल्वे ब्रिजवर प्रवाशांच्या चेंगराचेंगरीची असो वा स्टेडियममधील चेंगराचेंगरीची असो. बहुतेक दुर्घटना धार्मिक कार्यक्रमामध्ये किंवा कार्यक्रमानंतर घडल्याच्या दिसून येतात. अशा प्रकारची दुर्घटना घडली की नेहमीप्रमाणे चौकशी करण्याचे आदेश देऊन चौकशी समिती नेमली जाते,

कालांतराने ही समिती आपला अहवाल सादर करते. खरे तर अशा प्रकारच्या अहवालांमध्ये जे निष्कर्ष काढण्यात आलेले असतात ते निष्कर्ष दिशादर्शक असतात. अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून काळजी घेण्याचे संकेत त्यातून मिळू शकतात. परंतु दुर्दैवाने अशा अहवालांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, त्यांना केराची टोपली दाखविली जाते आणि दुर्घटना घडतच राहतात. दुर्घटनांमध्ये वागायचे कसे याबाबतचे कोणतेही शिक्षण समाजाला दिले जात नाही. खरे तर शालेय शिक्षणात वर्गात जाताना किंवा वर्गातून बाहेर पडताना रांगेत जाण्याचे शिक्षण सर्वांनाच मिळालेले असते. पण हे शिक्षण कालौघात विसरले जात आहे असे म्हणता येईल. गर्दीमध्ये प्रत्येकालाच पुढे जाण्याची घाई असल्याने आपण इतरांना दुखापत करून अथवा इतरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरून पुढे जात आहोत याचा विचारच केला जात नाही. प्रत्येकाला आपलाच जीव वाचवायची घाई असल्याने या गदारोळात दुर्घटना घडून मृत्यूंची संख्या वाढणे अपरिहार्य असते. आगीसारख्या दुर्घटनेत हेच दिसून येते. आगीत होरपळून मरण्यापेक्षा आगीच्या भीतीने चेंगराचेंगरी होऊन मरणा-यांची संख्या अधिक असते.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये शिस्तीने वागायचे कसे याबाबतचे कसलेही औपचारिक शिक्षण देण्यात येत नाही, ते आता देण्याची गरज आहे. कोणत्याही ठिकाणी आत जाण्याची वा बाहेर येण्याची जी घाई असते तीच जीवघेणी ठरू शकते. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केलेले असते त्यांनीच त्या ठिकाणची संपूर्ण जबाबदारी घेण्याची गरज असते. कारण त्यांनाच माहीत असते की किती लोक जमणार आहेत. हाथरस दुर्घटनेनंतर फरार झालेले भोलेबाबा अजूनही बेपत्ता आहेत. सत्संगाच्या आयोजनातील सहा सेवादारांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. या सेवादारांचा प्रमुख मात्र अजून बेपत्ता आहे. भोलेबाबाला चौकशीसाठी का बोलावले जात नाही हे एक गूढच आहे. टीम इंडियाच्या स्वागत प्रसंगी कोणतीही दुर्घटना घडली नाही, ही आनंदाची गोष्ट. भविष्यात एखादी अप्रिय घटना घडणार नाही याची बीसीसीआयने काळजी घ्यायला हवी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR