24.7 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeराष्ट्रीयनीटचा पेपर लीक, केंद्राची प्रथमच कबुली

नीटचा पेपर लीक, केंद्राची प्रथमच कबुली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नीटचा पेपर लीक झाला असल्याची कबुली पहिल्यांदाच केंद्र सरकारने दिली. या प्रकरणी गुन्हा नोंद करून आरोपींनाही अटक केल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. पेपरफुटीत ज्या विद्यार्थ्यांना फायदा झाला, त्यांची ओळख पटली असून, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

एकीकडे नीट पेपरफुटीचा तपास सीबीआयने सुरू केला आहे, तर दुसरीकडे या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पेपर रद्द करण्याची मागणी करणा-या विद्यार्थ्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना ५ मे रोजी परीक्षा झाली होती आणि निकाल १४ जूनला जाहीर होणार होता. मात्र निकाल ४ जूनलाच जाहीर करण्यात आला. परीक्षेच्या एक दिवस आधी एका टेलिग्राम चॅनलवर नीट परीक्षेचा पेपर आणि त्याची उत्तरपत्रिकाही देण्यात आली होती. परीक्षा आयोजित करणा-या एनटीएनेही काही विद्यार्थ्यांना चुकीचे पेपर मिळाल्याचे मान्य केले आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली, ज्यात नीटचा पेपर लीक झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पाटणा येथे एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.

६७ मुलांना प्रथमच
सर्वच्या सर्व ७२० गुण
सुरुवातीला बिहार पोलिसांकडे उघड झालेल्या तथ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पेपर लीक झाल्याची माहिती मिळते. या परीक्षेत ६७ मुलांनी ७२० पैकी ७२० गुण मिळवले. त्यापैकी ६ विद्यार्थी एकाच केंद्रातील होते. विशेष म्हणजे या अगोदर दोन-तीनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कधीच पूर्ण गुण मिळाल्याचे इतिहासात यापूर्वी कधी घडले नव्हते असे न्यायालयात सांगण्यात आले. १५६३ मुलांना ग्रेस गुण देण्यात आले होते, असेही वकिलांनमी सांगितले.

व्हॉटसअ‍ॅप, टेलिग्राम
चॅनलवर पेपर लीक
विद्यार्थ्यांच्या वकिलांनी सांगितले की, व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम चॅनलवर पेपर लीक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. फुटलेला पेपर एका शाळेत वाय-फाय प्रिंटरद्वारे छापण्यात आला होता. बिहार पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात अशा वेगवेगळ््या गटांची माहिती मिळाली आहे, असे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR