निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजनीसह परिसरामध्ये दि ८ जुलै सोमवारी रोजी मध्यरात्री साडे दहा ते साडेबारा दरम्यान अचानक जोरदार ढगफुटी सदृश्य पाऊस झाला यामुळे अनेकांच्या शेती जमिनी खरडून गेल्या तर औराद तगरखेडा रस्त्याचा पुलाचा भाग वाहून गेला. त्याशिवाय अनेक गावांचा सकाळपर्यंत संपर्क पाण्यामुळे तुटलेला होता.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानिसह परिसरात सोमवारी मध्यरात्री दोन तासात तब्बल ११६ मिलिमीटर पाऊस या भागामध्ये झाल्याने नदी, नाले, ओढे, भरून वाहू लागले आहेत. या जोराच्या पावसामुळे औराद तगरखेडा पुलाची एक बाजू वाहून गेल्याने मंगळवारी वाहतूक बंद होती तर या भागातील अनेक ओढ्यांना नाले यांना पूर आल्याने नदी पलीकडील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान शेती जमिनीचे मोठे नुकसान झाले असून पिके माती खरडून गेली असून आतापर्यंत या भागांमध्ये तब्बल ४४५ मिलिमीटर पाऊस पडल्याची औराद शहाजनी येथील हवामान केंद्रावर नोंद झाल्याचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी एकमतशी बोलतांना सांगितले.