वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात या शैक्षणिक वर्षापासून १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याची मोठी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यक परिषदेने ५० एम.बी.बी.एस. विद्यार्थी क्षमतेने परवानगी दिलेली आहे तर उर्वरित ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अर्जाबाबत राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या त्रुटी पूर्ण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता जिल्हा गडचिरोली, जालना, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नाशिक, भंडारा, अंबरनाथ (जिल्हा ठाणे) आणि मुंबई (१० संस्था) येथे १०० एम.बी.बी.एस. विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याकरिता राष्ट्रीय वैद्यक परिषद, नवी दिल्ली यांना अर्ज सादर करण्यात आला असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली. यासंबंधी त्रुटींची पूर्तता करण्याची कार्यवाही शासन आणि संचालनालय स्तरावर सुरू आहे. तसेच अध्यापकांची पदे भरण्याची कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सुरू असून वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आणि संलग्नित रुग्णालय या संदर्भातील कार्यवाही पूर्ण झालेली आहे. तसेच काही अध्यापकांची पदे कंत्राटी, मानधनावर भरण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
राष्ट्रीय वैद्यक परिषदेकडे अपिल दाखल करणार
त्रुटी दर्शविलेल्या प्रस्तावित ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकरिता राष्ट्रीय वैद्यक परिषद, नवी दिल्ली यांच्याकडे शासनामार्फत अपील दाखल करण्यात येणार आहे. या अपिलच्या सुनावणीस शासनाकडून त्रुटी पूर्तते संदर्भातील हमीपत्र सादर करुन या महाविद्यालयांना परवानगी प्राप्त करण्याच्या अनुषंगाने योग्य ते प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मुश्रीफ यांनी सांगितले.