हिंगोली/नांदेड/परभणी : नांदेड शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्याला सकाळी ७:१४ वा. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून या धक्क्यांची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या भूकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात आहे.
नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची सकाळ भूकंपाच्या धक्क्याने झाली. हा धक्का बसल्यानंतर अनेक नागरिकांनी घराबाहेर पडणे पसंत केले. भूकंपाचा धक्का अतितीव्र नसला तरी साधारणतः दोन ते तीन सेकंदापर्यंत खिडक्यांची काचे व्हायब्रेट होत होती. नांदेडसह, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांनाही हा ४.५ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला असून कळमनुरीच्या परिघात येणार्या बहुतांश भागांमध्ये जाणवल्याची माहिती आहे.
नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी ते त्वरित दगड काढून घ्यावेत, असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.