27.5 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा-ओबीसी आरक्षणावरुन घमासान!

मराठा-ओबीसी आरक्षणावरुन घमासान!

मराठा-ओबीसीत महायुतीनेच भांडणे लावलीत : वडेट्टीवार सत्ताधारी विरोधकांत आरोप-प्रत्यारोप

मुंबई : गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १३ जुलैपर्यंतची राज्य सरकारला मुदत दिली आहे, यानंतर पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनही सुरू आहे. आज विधिमंडळात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरुन चर्चा झाली.

सत्ताधारी गटातील आमदारांनी विरोधी पक्षातील आमदारांवर आरोप केले. बुधवार दि. १० जुलै रोजी विधिमंडळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपा आमदार अमित साटम यांनी विरोधी पक्षातील आमदारांवर टीका केली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देत महायुतीवर गंभीर आरोपही केले.

काल मराठा आरक्षणा संदर्भात सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात जातीच्या नावावर तेढ निर्माण होत आहेत, काही गावात मराठ्यांच्या लग्नाला ओबीसी जात नाहीत, ओबीसींच्या लग्नाला मराठे जात नसल्याचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे या विषयावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. पण विरोधी पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार घातला.

विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचे आहे असा आरोपही आमदार अमित साटम यांनी केली. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोधी पक्षाचा पाठिंबा आहे की नाही हे जाहीर करावे, अशी मागणीही भाजपा आमदार अमित साटम यांनी केली. यावेळी सभागृहात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. आरक्षणाबाबत साटम यांनी विरोधी पक्षांना आपली भूमिका जाहीर करण्याची मागणी केली.

मनोज जरांगेंना केली विनंती
यावेळी सभागृहात भाजपा आमदार अमित साटम यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना विनंती केली. विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचे आहे, जरांगे यांनी विरोधी पक्षाची काय भूमिका आहे हे पाहावे असेही आमदार अमित साटम म्हणाले.

विरोधी पक्षनेत्यांनी दिले प्रत्युत्तर
यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधा-यांना प्रत्युत्तर दिले. वडेट्टीवार म्हणाले, राजकारण कोण करत आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. महायुतीनेच मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR