पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे एकामागोमाग एक कारनामे पुढे येत आहेत. आधी गाडीचे प्रकरण, नंतर संपत्तीचे प्रकरण, त्यानंतर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आणि आता दिव्यांग प्रमाणपत्र; शासनाची फसवणूक करुन नोकरी मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.
याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पूजा खेडकर प्रकरणात शासनाने शहनिशा करावी. सामान्य कुटुंबातील मुले खूप कष्ट घेतात, तरीही त्यांना सरकारी नोकर भरतीमध्ये संधी मिळत नाही. मात्र काही लोक कागदपंत्राची फेरफार करून अधिकारी झाले असतील आणि तसे रिपोर्ट्स असतील तर सरकारने याबाबत लक्ष घालावे. या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, पूजा खेडकर यांची पुण्यातून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर आता वाशिमच्या सहाय्यक जिल्हाधिकारी असणार आहेत. पूजा खेडकरबाबत अनेक नवे खुलासे समोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांच्याकडे मोठी संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. तरीही पूजा खेडकर यांनी ओबीसी आरक्षणाला लाभ घेऊन नोकरी मिळवल्याचे सांगितले जात आहे. मात्र पूजा यांचे वार्षिक उत्पन्न ४२ लाख रूपये असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे १७ कोटींहून आधिकची संपत्ती असल्याचे सांगितले जात आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरने २०२१ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. या परिक्षेत त्यांचा रँक ८२१ होता. तिने स्वत:ला दिव्यांग घोषित केले असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात कारनामे केल्याने त्यांची वाशिमला बदली करण्यात आलेली आहे.