पालघर : पालघर जिल्ह्यात युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर आला आहे. डहाणूतील गंजाड मनिपुर येथे काळा बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला ६० पोती युरियाचा साठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कृषी विभागाने जप्त केला आहे.
पालघरच्या डहाणू तालुक्यातील गंजाड मनिपुर येथे युरिया खताचा काळा बाजार उघडकीस आला आहे. येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले ६० पोती युरिया जप्त करण्यात आले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत माहिती दिली होती, ज्यामुळे कृषी विभागाने तातडीने कारवाई केली. मार्क्सवादी पक्षाचे पदाधिकारी चंद्रकांत घोरखना, रडका कलांगडा, लहानी दौडा, राजेश भुरभुरे आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी साफळा रचत ही घटना उघड केली आहे. त्यांच्या सतर्कतेमुळेच युरियाचा काळाबाजार उघड झाला आहे.
प्रतिसाद: स्थानिक शेतक-यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. कृषी विभागाने पुढील तपासणीसाठी सॅम्पल घेतले असून जिल्हा कृषी अधिका-यांकडून कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आल आहे. पालघर जिल्यात गेल्या एक।महिन्या पासून युरिया खत उपलब्ध होत नसून खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या जिल्ह्यातील शेतक-यांनी कृषी अधिकारी कार्यालयात तक्रारी दाखल केल्या आहेत. जिल्ह्यात पावसाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी शेतक-यांच्या मागणीप्रमाणे युरिया खताचा पुरवठा करण्यात यावा अशा सूचना काही दिवसापूर्वी कृषीमंत्र्यांनी दिल्या होत्या मात्र पालघर जिल्ह्यात कृषी अधिका-यांच्याकडून त्याचे सुचनाचे पालन न झाल्याने ऐन मुख्य हंगामात शेतक-यांना युरिया पासून वंचित राहावे लागत असल्याने शेतक-यांनी तीव्र नाराज व्यक्त केले आहे. जिल्ह्यात यंदा उशिरा पेरणी सुरू झाली आहे.
कृत्रिम टंचाईचा सामना
काही भागात अतिवृष्टी, तर काही भागात पाऊस दडी मारून बसला असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला. खरीप पिकांची निगा राखण्यासाठी शेतकरी जोमाने कामाला लागले असताना. दुसरीकडे मात्र शेतक-यांना युरियाच्या कृत्रिम टंचाईचा देखील सामना करावा लागत आहे. शेतक-यांच्या मते, सरकारकडून युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात असली तरीही ग्रामीण भागात अशा प्रकारे काळाबाजार होत आहे. सरकारच्या नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.
शेतक-यांच्या समस्या वाढविल्या
सरकारकडून युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत, परंतु अशा घटनांनी शेतक-यांच्या समस्या वाढवल्या आहेत. कृषी अधिका-यांनी गंजाड येथील गोडवाना मध्ये ठेवलेला युरिया ताब्यात घेतला असून पुढील डहाणू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.