29.8 C
Latur
Saturday, October 19, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची १९ जुलैला मुंबईत बैठक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची १९ जुलैला मुंबईत बैठक

निवडणुकीची रणनिती आखली जाणार उद्याची बैठक ढकलली पुढे

नागपूर : लोकसभेच्या निकालानंतर प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. १९ जुलै रोजी मुंबईतील टिळक भवनात राज्यभरातील शहर व जिल्हाध्यक्षांसह प्रदेश पदाधिका-यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून तीत विधानसभा निवडणुकीची रणनिती आखली जाणार आहे. विशेष म्हणजे राज्यभरातून मागविण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या अर्जांचाही आढावा घेतला जाणार आहे.

ही बैठक १२ जुलैै रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्या दिवशी विधान परिषदेची निवडणूक असल्याने एक आठवडा पुढे ढकलण्यात आली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, आरिफ नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील उपस्थित राहतील. या बैठकीला जिल्हा प्रभारी व विविध आघाडी व सेलच्या प्रमुखांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, असे प्रदेश उपाध्यक्ष (प्रशासन व संघटन) नाना गावंडे यांनी कळविले आहे.

प्रदेश काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून १० ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागविले होते. संबंधित अर्जांचा अहवालही शहर व जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांकडून प्रदेश काँग्रेसला सादर केला जाईल. आलेले व पुढील प्रक्रियेवरही बैठकीत चर्चा होऊन धोरण ठरविले जाईल. या बैठकीत मतदार नोंदणीबाबतचा आढावा तसेच संघटनात्मक आढावा देखील घेतला जाणार आहे. ज्या शहर व जिल्ह्यातील पक्षाची महत्वाची पदे रिक्त आहेत तेथे नियुक्ती करण्यावरही चर्चा होईल. या बैठकीत संघटनात्मक आढावा घेतला जाईल. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR