मुंबई : प्रतिनिधी
उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत येथील वाय. बी. सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला. भालेराव यांच्यासोबत उदगीर-जळकोट तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी नाशिक जिल्ह्यातील देवळालीमधील लक्ष्मण मंडाले, अशोक पारडे यांनीही कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांचे पक्षाचे मफलर घालून स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, खा. सुप्रिया सुळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, जिल्हाध्यक्ष, संजय शेटे, बसवराज पाटील नागराळकर, चंदन पाटील यांच्यासह उदगीर-जळकोटमधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव गेल्या काही दिवसांपासून भाजपात नाराज असल्याची चर्चा सुरू होती.
मागील विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार असतानाही त्यांचे तिकीट कापून अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र, पक्षातील नेत्यांचा मान ठेवून उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. आता बदलत्या समीकरणात त्यांनी हा निर्णय घेऊन भाजपला मोठा धक्का दिला. यावेळी त्यांच्यासमवेत व्यंकटराव पाटील, प्रल्हाद सूर्यवंशी, बसवराज काळे, भाजपचे राजेंद्र केंद्रे, वसंत शिरसे, लक्ष्मीकांत पाटील, संदीप कुलकर्णी, शिल्पा इंगळे, रमा वाघमारे यांच्यासह अनेकांनी पक्षप्रवेश केला.
विधानसभेत मविआच्या
२२५ जागा निवडून येतील
निवडणुकीत वेगळ्या नावाने मते मागायची व नंतर दुसरीकडे जाता, हे लोकांना पटत नाही. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपाला नाकारत महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला. विधानसभा निवडणुकीतही असाच कौल मिळेल व महाविकास आघाडीच्या २२५ जागा निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केला. माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.