मुंबई : इमरान हाश्मी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. इमरानला आपण आजवर विविध भूमिकांमधून पाहिले आहे. ‘मर्डर’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘सेल्फी’, ‘गँगस्टर’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ असा अनेक सिनेमांमधूम इमरानने उत्कृष्ट अभिनय करुन बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. इमरानची एक विशेष गोष्ट म्हणजे तो कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला जाताना दिसत नाही. याविषयी प्रश्न विचारला असता इमरानने रोखठोक उत्तर दिले आहे, शिवाय अभिनेत्री कंगना रणौतवरही निशाणा साधला आहे.
शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये इमरान विविध विषयांवर व्यक्त झाला. तुलाही कंगना म्हणाली तसे पुरस्कार सोहळे बेकार वाटतात का? असा प्रश्न इमरानला विचारण्यात आला. त्यावर इमरान म्हणाला, पुरस्कार मिळणे बंद झाले आहे म्हणून ती असे म्हणत असेल. मला आठवतं की, मी एकदा पुरस्कार जिंकला होता. काही दिवसांनी मला पुरस्कार सोहळ्यांमागचा सगळा खेळ समजला. हा एक प्रकारचा सौदा आहे, तुम्ही येऊन नाचता. आता मी असे म्हणणार नाही की, पुरस्कार हे चांगले नाहीत. हा पण ज्यांना त्यांची राहण्याची खोली सजवायची आहे त्यांनी खुशाल पुरस्कार घ्यावेत.
कंगनाच्या तक्रारीवर इमरान काय म्हणाला?
पुरस्कार सोहळ्यांबाबत कंगना रणौतच्या तक्रारीवर चर्चा करताना अभिनेता म्हणाला, तुम्ही इंडस्ट्री बाहेरचे असाल तर एखाद्या गोष्टीला विरोध करणं चांगले आहे. पण तुम्ही इंडस्ट्रीत राहूनही वारंवार सांगत असाल तर तो मोठा अडथळा ठरु शकतो. मला उगाच कोणाला कठोर शब्दात काही बोलायचे नाही. पण अशी तक्रार करणे हा एक बहाणा आहे.
तुम्ही पुढे जायला हवे.
इमरान हाश्मी पुढे म्हणाला, मी जर चांगली कामगिरी केली असेल तर मी स्वत:च्या पाठीवर थाप मारु शकत नाही, कारण ते खोटे आहे. जर तुम्ही चांगली कामगिरी केली असेल तर तुम्हाला नक्कीच पुरस्कार मिळाला पाहिजे. पण पुरस्कार जिंकणे हा एक करार असेल तर जिंकण्यात काय अर्थ आहे? अशाप्रकारे पुरस्कार सोहळ्यात का सहभागी होत नाही, यामागचे कारण इमरानने स्पष्ट केले आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, इमरान लवकरच ‘शोटाइम’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.