29.2 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeमहाराष्ट्रती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच

ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच

शंका उपस्थित करू नये सुधीर मुनगंटीवारांचे आवाहन

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या आस्थेचा, स्वाभिमानाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असून हे सरकार छत्रपती शिवरायांबाबत अतिशय गंभीर आहे. लंडनहून येणा-या वाघनखांसंदर्भात राज्यातील जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून ही वाघनखे महाराजांचीच असल्याचा पुनरुच्चार राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवार दि. १२ जुलै रोजी विधानसभेत समाचार घेतला.

तसेच, १९ जुलैला साता-यात जल्लोषात वाघनखांचे स्वागत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विधानसभेत अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी लंडनवरून आणण्यात येणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांची असण्याबाबत चर्चा सुरु आहे. यावर सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी निवेदन करण्याची मागणी केली. यावर सविस्तर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अलबर्ट संग्रहालयात असलेल्या वाघ नखाबाबत विविध पुरावे उपलब्ध आहेत. ते म्हणाले, लंडनवरून आणण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे प्रदर्शन येत्या १९ जुलै रोजी साता-यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात करण्यात येत असून तेथे जोरदार स्वागत होणार असून कार्यक्रमाचे जाहीर निमंत्रणदेखील त्यांनी आमदारांना व शिवप्रेमींना यावेळी दिले.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अतिक्रमण हटवले गेल्यानंतर अनेक शिवभक्तांनी छत्रपतीं शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमध्ये असून ती भारतात आणावीत अशी मागणी केली. त्यासंदर्भातील काही कागदपत्रे अनेक शिवभक्तांनी आमच्याकडे आणून दिली, पाठवली. व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडे सदर वाघनखे दिली जाण्या पूर्वी लंडनमध्ये १८७५ व १८९६ या वर्षी झालेल्या एका प्रदर्शनात ही वाघनखे प्रदर्शित झाली होती. त्या प्रदर्शनाच्या बातम्यांची कात्रणेही काही शिवभक्तांनी पाठवली, ज्यात ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली असल्याचा उल्लेख त्या प्रदर्शनात केला असल्याचे त्या बातम्यात म्हटले होते. लंडनमधील संबंधित संग्रहालयात अनेक वाघनखे आहेत हे खरे असले तरी केवळ या विशिष्ट वाघनखांनाच १८२५ मध्ये विशेष पेटीचे आवरण बनविण्यात आले आहे आणि त्यावर ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधासाठी वापरल्याचा स्पष्ट उल्लेख आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR