मुंबई : विधानपपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे अखेर भाजप कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत मोहिते पाटील हे भाजप पक्ष कार्यालयात आल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी पक्ष कार्यालयात भाजप नेत्यांशी चर्चा देखील केली. यावेळी भाजप नेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. माढा लोकसभेबाबत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतलेल्या संशयास्पद भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, अखेर ते भाजपच्या कार्यालयात पाहायला मिळाले.
रणजितसिंह मोहिते पाटील हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. ते सध्या भाजपचे विधनपरिषदेचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. भाजपने पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे मोहिते पाटील नाराज होते. अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले. या निवडणुकीत मोठ्या मतांनी धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले. या संपूर्ण प्रक्रियेत रणजितसिंह मोहिते पाटील शांत असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी कोणाचाच प्रचार केला नाही. मात्र. त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात होते. तसेच त्यांनी बंधु धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत केल्याचेही बोलले जात आहे.