लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयातून पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी वारी निमित्त मोठया प्रमाणात भाविक-भक्त पायी व वाहनांनी जातात. भाविक-भक्तांना पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने लातूर विभागातील पाच आगारातून १०५ एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. आषाढी वारी यात्रेतून १०५ एसटी बसेसना ९३ लाख ६० हजार रूपयांचे उत्पन्न राज्य परिवहनच्या लातूर विभागाला मिळेल अशी अपेक्षा आहे.
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा…म्हणत पंढरपूरला आषाढी वारी निमित्त लातूर जिल्हयातून पंढरपूरला विठ्ठल-रूक्मीणीचे दर्शन घेण्यासाठी मोठया प्रमाणात दरवर्षी भाविक-भक्त जातात. या वारीचा मुख्य दिवस बुधवार दि. १७ जुलै हा आषढी एकादशीचा दिवस समोर ठेवून राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाने दि. १३ ते २२ जुलै या कालावधीत लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर या पाच आगारातून १०५ एसटी बसेस चालविण्याचे नियोजन केले आहे. यात लातूर आगारातून २८ बसेस, उदगीर आगारातून २४ बसेस, अहमदपूर आगारातून १८ बसेस, निलंगा आगारातून १८ बसेस, औसा आगारातून १७ सोडण्यात येणार आहेत.
यात्रा कालावधीत प्रत्येक आगारातून यात्रेकरूंच्या मागणी प्रमाणे एसटी बससेची व्यवसथा करण्यात येणार आहे. तसेच ज्या गावातून थेट ४५ प्रवाशी उपलब्ध होतील त्या गावास बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच परतीच्या आरक्षणाची व्यवस्था करून यात्रेकरूंना पंढरपूर ते गावापर्यंत सेवा पुरवण्यात येणार आहे. पंढरपूर येथील भिमा यात्रा बसस्थानक येथून लातूर विभागाच्या बसेस यात्रेकरूंसाठी ये-जा करणार आहेत.