26.4 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रगद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतली निवडणूक

गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतली निवडणूक

मुंबई : विधान परिषद निकालावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपच्या १०३ आमदार व त्यांना पाठिंबा देणा-या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले आहेत. शिंदे गट व अजित पवार गट हे दोन गद्दार गट आहेत. त्यांनी आपल्या दोन-दोन गद्दारांना मतांच्या ताकदीवर निवडून आणले. गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक आहे असा टोला राऊत यांनी लगावला.

काँग्रेसने आपला उमेदवार निवडून आणला, शिवसेनेकडे कोटा नसतानाही आपला उमेदवार दिला आणि काँग्रेसच्या मदतीने आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला आहे. काँग्रेसची सात मते फुटली, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ते आधीच फुटलेले आहेत. मागच्या विधान परिषद निवडणुकीत याच सात लोकांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव केला होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही मत फुटलेले नाही असा दावा राऊत यांनी केला. काँग्रेसची जी सात मते फुटली आहेत ती मागील दोन वर्षांपासून काँग्रेस सोबत नाहीत. यामुळे आम्हाला कोणताही धक्का बसलेला नाही. अपक्ष आमदारांचा भाव काल शेअर मार्केटसारखा वाढत होता. महाविकास आघाडी मजबूत आहे. शिवसेनेकडे केवळ १५ मते असताना मिलिंद नार्वेकर हे निवडून आले आहेत. जयंत पाटील निवडून आले असते पण गणित जुळले नाही. त्यांच्याकडे स्वत:च्या पक्षाचे मत नव्हते. इतर घटक पक्षांवर आम्ही अवलंबून होतो परंतू ते सत्ताधा-यांसोबत होते. जयंत पाटील यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, असे स्पष्टीकरण राऊत यांनी जयंत पाटलांना ठरवून पाडल्याच्या चर्चांवर दिले आहे.

नाना पटोले या सात लोकांवर कारवाई करणार असे मी ऐकले आहे. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असे त्यांनी सांगितले आहे. पटोले निवडणूक होईपर्यंत ठाण मांडून बसले होते. जे आमदार स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजतात त्यांनी धर्मांधांना साथ दिली. २०-२५ कोटी रुपये एका मताला दिले गेलेत. काही आमदारांना २ एकर जमीन देखील दिली आहे. आम्ही आमच्याकडे जेवढी ताकत होती तेवढी लावली असेही राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR