25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रराणा दाम्पत्याचा वारीत सहभाग, पांडुरंगाचरणी नतमस्तक

राणा दाम्पत्याचा वारीत सहभाग, पांडुरंगाचरणी नतमस्तक

अमरावती : अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी आली आहे. राज्यभरातून निघालेल्या संतांच्या पालख्या आणि लाखो वारकरी पंढरपूरच्या मार्गावर आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाची आस वारक-यांना लागली आहे. राज्याभरात कोसळत असलेल्या भर पावसातही न दमता, उसंत न घेता वारकरी पायी वारी करत आहेत. वारक-यांचा उत्साह दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातच आता माजी खासदार नवनीत राणा आणि विद्यमान आमदार रवी राणा या दाम्पत्याने वारीत सहभागी झाल्यानंतर पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले.

पाऊले चालती पंढरीची वाट, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल चरणी नतमस्तक झाले. डोक्यावर तुळस घेऊन फुगडीचा फेर धरत पंढरीच्या वारीत सहभाग घेतला. महाराष्ट्रासह अमरावती जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक, कष्टकरी, श्रमजीवी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुख, समृद्धी तसेच शांतीसाठी श्री पांडुरंगाला साकडे घातले, अशी माहिती नवनीत राणा यांनी एक्सवर पोस्ट करत दिली.

आमदार रवी राणा वारक-यांच्या पेहराव्यात दिसले. तर, नवनीत राणा यांनी डोक्यावर तुळस ठेवून पायी वारी केली. तसेच नवनीत राणा यांनी वारीतील महिलांबरोबर फुगडी खेळली. त्यानंतर राणा दाम्पत्यानेही एकमेकांबरोबर फुगडी खेळली, अशी माहिती देण्यात आली आहे. शेतकरी, शेतमजूर भगिनींसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप कामे केली आहेत. या कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनत महायुतीला आशीर्वाद देईल, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळात खोटा प्रचार केला गेला. खोटे जास्त दिवस चालत नाही. सत्य हे सत्य असते. येणा-या भविष्यात खोट्याचा प्रचार करणा-यांना धडा नक्की शिकवणार आहे असे राणा यांनी सांगितले.

दरम्यान, महायुतीचे सरकार येण्यासाठी माऊलीच्या दर्शनाला आम्ही आलो आहे. महायुतीचे सरकार पुन्हा बसावे म्हणून आम्ही साकडे घातले. जेव्हा निवडणूक लढले, तेव्हा स्वत:च्या विश्वासावर निवडणूक लढले. त्यामुळे माझा पराभव झाला. खूप संघर्ष आणि मेहनत घेतली होती. परंतु, कुठेतरी कमतरता राहिली असेल त्यामुळे पराभव झाला. मी भाजप कार्यकर्ता आहे, रवी राणा हे महायुतीचे घटकपक्ष म्हणून गेल्या १० वर्षांपासून मोदींबरोबर आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणार आहे असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR