मुंबई : शुक्रवारी १२ जुलैला अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचं लग्न धुमधडाक्यात पार पडलं. या लग्नाला अवघं तारांगण अवतरलं होतं असं म्हटल्यास वावगं ठरु नये. केवळ भारतीयच नव्हे तर जगभरातील बॉलिवूड सेलेब्रिटी अनंत-राधिकाच्या लग्नाला उपस्थित होते. या सर्व सेलेब्रिटींमध्ये लक्ष वेधलं ते म्हणजे बॉक्सर जॉन सीनाने. जॉनने निळ्या रंगाचा खास कुर्ता परिधान करुन सर्वांची मनं ंिजकली. जॉन मायदेशी गेल्यावर त्याने लग्नाचा अनुभव सांगताना बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानबद्दल खास शब्द वापरले आहेत.
जॉनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. यात त्याने शाहरुख खानसोबतचा फोटो शेअर केला आहे. जॉन लिहितो, कल्पनेच्या पलीकडले २४ तास. प्रेमळपणा आणि सुंदर आदरातिथ्याबद्दल अंबानी कुटुंबांचा आभारी आहे. एक असा अविस्मरणीय क्षण ज्यामध्ये मला अगणित नवीन मित्र मिळाले. शाहरुख खानमुळे माझ्या आयुष्यावर झालेला सकारात्मक परिणाम मी त्याला वैयक्तिकरित्या सांगू शकलो. अशा शब्दात जॉनने अंबानींच्या लग्नातला अनुभव सांगितलाच शिवाय शाहरुख खानचेही कौतुक केले.
जॉन सीनावर भारतीय फिदा
जॉन सीनाने डब्ल्यूडब्ल्यूईच्या माध्यमातून अनेकांचं बालपण समृद्ध केलंय. जॉन सीनाचं वय वाढलं असलं तरीही त्याचा चार्म अजूनही आहे तसाच आहे. जॉन सीनाने ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी त्याचे कौतुक केले. जॉन सीना कुर्ता, लेहंगा, पगडीमध्ये खूपच देखणा दिसत होता, असं चाहत्यांचे म्हणणे आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने जॉन सीनाचे जोरदार स्वागत केले.