वॉशिंग्टन : २०२४ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे आयोजित रॅलीदरम्यान हा हल्ला झाला. मात्र, या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले. गोळी त्याच्या कानाला चाटून गेली. त्यामुळे त्यांचा चेहराही रक्तबंबाळ झाला होता. ट्रम्प यांच्या सुरक्षेत असलेल्या सीक्रेट सर्व्हिसच्या अधिका-यांनी त्यांना तात्काळ घटनास्थळापासून दूर नेले. मात्र, या हल्ल्यात एका ट्रम्प समर्थकाचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला. या भ्याड हल्ल्यामुळे अमेरिकेसह जगातील सर्व देश हादरले आहेत.
सीक्रेट सर्व्हिसच्या अधिका-यांनी सांगितले की, शूटरने एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून गोळीबार केला. हल्ल्यानंतर सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी तातडीने कारवाई करत हल्लेखोराला ठार केले. डोनाल्ड ट्रम्प ज्या ठिकाणी भाषण करत होते त्या ठिकाणापासून ही इमारत फक्त १५० मीटर अंतरावर होती. गोळीबारानंतर रॅलीच्या ठिकाणी अचानक गोंधळ उडाला. हल्ल्यादरम्यान ट्रम्प यांच्यासोबत मंचावर असलेले रिपब्लिकन उमेदवार डेव्ह मॅककॉर्मिक म्हणाले की, गोळीबार झाल्यानंतर सर्वजण सावध होऊन खाली बसले. हल्लेखोराने ८ गोळ्या झाडल्या. यानंतर ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना गराडा घालून गाडीत बसवले आणि सुरक्षित ठिकाणी हलवले. या घटनेची चौकशी अमेरिकेच्या तीन सुरक्षा संस्था करत आहेत. दरम्यान, १९८१ मध्ये डोनाल्ड रेगन यांच्या हत्येनंतर माजी अध्यक्ष आणि अध्यक्षपदाच्या उमेदवारावर हा पहिलाच हत्येचा प्रयत्न होता. अमेरिकेत ४ महिन्यांनंतर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका होणार आहेत.
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी चिंता व्यक्त केली
या घटनेबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चिंता व्यक्त केली असून, ट्रम्प यांच्या रॅलीत झालेल्या गोळीबाराची माहिती मिळाली. ट्रम्प सुरक्षित आहेत हे जाणून मी कृतज्ञ आहे. त्यांच्या कुटुंबासाठी आणि रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांसाठी प्रार्थना करतो अशी पोस्ट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली.