चेन्नई : तामिळनाडूतील बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी आज पहाटे चकमकीत ठार केले आहे. चेन्नई पोलिस अधिका-यांनी ही माहिती दिली. थिरू वेंगडम असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चेन्नई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसपा अध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ११ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी थिरू वेंगडम नावाच्या आरोपीला आर्मस्ट्राँग यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र मिळवण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आले. यावेळी त्याने जप्त केलेल्या बंदुकीने पोलिसांवर गोळीबार सुरू केला असता, प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला. बीएसपी नेते के आर्मस्ट्राँग यांची ५ जुलै रोजी चेन्नईच्या पेरांबूर भागात त्यांच्या राहत्या घराजवळ सहा अज्ञातांनी हत्या केली होती. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी आर्मस्ट्राँगवर रस्त्यावर चाकूने हल्ला केला, यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हल्ल्यामुळे विरोधी भाजपने राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. शिवाय बसपा प्रमुख मायावती यांनीही आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.